भुसावळ : काही दिवसापुर्वी पुष्पक एक्सप्रेसमध्ये दरोडेखोरांनी एका महिला प्रवाशावर बलात्कार केल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे रेल्वेतील महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, याप्रकरणी या गाडीवर नियुक्त असलेल्या सुरक्षा रक्षक व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी राष्ट्रीय दलित पँथरतर्फे रेल रोकोचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार संघटनेचा मोर्चा रेल्वे स्थानकावर धडकला असता, त्यांना प्रवेशद्वारावरच रोखण्यात आले.

यासंदर्भात प्रशासनास निवेदन देण्यात आले असून, यात नमूद करण्यात आले की, ८ ऑक्टोबर रोजी पुष्पक एक्सप्रेसमध्ये इगतपुरी जवळ दरोडेखोरांनी महिला प्रवाशावर अत्याचार केला. तरी रेल्वेगाडी सुरक्षा रक्षक कर्मचारी अधिकाऱ्यांना निलंबित करणे व लुट झालेल्या प्रवाशांना व महिलांना नुकसान भरपाई द्यावी. भुसावळ येथील रेल्वे हद्दीतील अतिक्रमण हटवून येथील गोरगरीबांना विस्तापित करण्यात आले. त्यांचे तातडीने पुनर्वसन करण्यात यावे. प्रत्येक कुटुंबांना सरकारने पाच लाखांची नुकसान भरपाई सोयी-सुविधा द्यावी. स्टेशन परिसरात बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते लोखंडी पुलापर्यंतचे रस्त्याची दुरुस्तीची मागणी करण्यात आली आहे. याप्रसंगी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ सोनवणे, जिल्हाअध्यक्ष सुदाम सोनवणे, वैशाली हिरोळे, राजू तायडे, अल्केश मोरे, शांताराम नरवाडे, सुनिल रायमोळे आदी हजर होते.


