भुसावळ -संपूर्ण देश अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत आहे या निमित्त रमण सायन्स अँड टेक्नॉलॉजी फाउंडेशन गुजरात, ऑल इंडिया रामानुजन मॅथ क्लब, नॅशनल कौन्सिल ऑफ टिचर्स सायंटिस्ट इंडिया व एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट इंडिया यांच्या माध्यमातून सर्वसामान्यांमध्ये गणिता विषयी आवड व कुतूहल निर्माण व्हावे याकरिता गुजरात येथून महात्मा गांधी जयंती निमित्त रामानुजन अमृत भारत गणित यात्रा 2021 निघणार असून ही यात्रा महाराष्ट्रात देखील येणार आहे. यात्रेच्या महाराष्ट्र समन्वयक पदी सुनिल वानखेडे व संदीप पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
रामानुजन अमृत भारत गणित यात्रेचे आयोजनासाठी गणित संत डॉ. चंद्रमौली जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली एक उच्चस्तरीय राष्ट्रीय समिती तयार करण्यात आली आहे. ज्यामध्ये उत्तर प्रदेश येथील ब्रिजेश दीक्षित व गुजरात येथील मेहुल कुमार या यात्रेचे संचालन करणार आहेत. या यात्रेचा मार्ग तयार करण्यात आला असून प्रत्येक राज्यात समन्वयकांची नेमणूक करण्यात आली आहे. शालेय विद्यार्थ्यांनसह प्रत्येक राज्यातील शिक्षण व डायट विभागातील अधिकारी, पदाधिकारी या यात्रेत सहभागी होणार आहेत. यात्रेचा शुभारंभ दिनांक 2 ऑक्टोबर 2021 महात्मा गांधी जयंतीला गुजरात येथील प्रसिद्ध मंदिर सोमनाथ येथे व समारोप 22 डिसेंबरला भारताचे महान गणिती श्रीनिवास रामानुजन त्यांच्या जन्मदिवशी त्रिपुरा राज्यातील आगरतला येथे होणार आहे. गुजरात(सोमनाथ) ते त्रिपुरा दरम्यान 25 राज्यांमधील 75 शाळांमध्ये 82 दिवस यात्रा पोहचणार आहे. ही यात्रा महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर 2021 दरम्यान येणार आहे. या यात्रेचे स्वागत जळगाव जिल्ह्यात होणार असून यामध्ये शिक्षण विभागातील विविध अधिकारी, गणित व विज्ञान शिक्षक व विद्यार्थी सहभागी होणार आहेत. रमण सायन्स अँड टेक्नॉलॉजी फाउंडेशन गुजरात, ऑल इंडिया रामानुजन मॅथ क्लब या संस्था अनेक वर्षांपासून गणित व विज्ञान लोकप्रिय व्हावे व विद्यार्थ्यांच्या मनातील गणिताविषयीची भीती निघावी यासाठी राष्ट्रीय व राज्य स्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात या क्लब अतर्गत नॅशनल कौन्सिल ऑफ टिचर्स सायन्टिस्ट, एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट, नॅशनल चिल्ड्रन एकेडमी, विज्ञान प्रसार या संस्था सहभागी होणार आहेत.
सुनील वानखेडे व संदीप पाटील यांना प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचा मान

रामानुजन अमृत भारत गणित यात्रा 2021 या यात्रेचा शुभारंभ गुजरातमधील सोमनाथ येथून गांधी जयंतीला होणार आहे. यात्रेत शुभारंभासाठी APJKYS चे संचालक सुनील वानखेडे व NCTS राष्ट्रीय सचिव संदीप पाटील यांना प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचे पत्र नुकतेच प्राप्त झाले आहे. ही यात्रा मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर ला येणार आहे व विविध शाळांमध्ये 23 नोव्हेंबरपर्यंत भेटी देऊन पुढे कर्नाटक मध्ये जाणार आहे या यात्रेच्या नियोजनासाठी व आयोजनासाठी एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट महाराष्ट्र संचालक सुनील वानखेडे व नॅशनल कौन्सिल ऑफ टिचर्स सायन्स नॅशनल सेक्रेटरी यांची महाराष्ट्र समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली असून जिल्ह्यातील जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रेचे नियोजन लवकरच ठरविण्यात येणार आहे.


