भुसावळ : भुसावळ येथून जळगावकडे जात असलेल्या इंजिनाचा हॉर्न अचानक वाजू लागल्याने इंजिन लोखंडी पुलाच्याजवळ थांबवण्यात आले. हा प्रकार सोमवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास तब्बल 25 मिनिटं वाजत असलेल्या सायरनमुळे रस्त्यावरून येणार्या-जाणार्या नागरीकांनी थांबून नेमके काय झाले याची कुतुहलाने माहिती जाणून घेतली.

सातत्याने वाजत असलेल्या हॉर्नच्या कर्णकर्कश आवाजामुळे नागरीकांना मोठा मनस्तापही सोसावा लागला. हा प्रकार रेल्वे वरीष्ठ अधिकार्यांपर्यंत पोहोचल्यानंतर संबंधित विभागाच्या कर्मचार्यांनी रेल्वे इंजिनाजवळ (डब्ल्यू.डी.64-70072) धाव घेत तांत्रिक बिघाड दूर केल्याने नागरीकांना मोठा दिलासा मिळाला. डिझेल लोकोवरील लोको पायलटने संबंधिताना याबाबत माहिती कळवल्यानंतर तांत्रिक विभागातील कर्मचार्यांनी धाव घेत हॉर्नमधील बिघाड दूर केल्याने नागरीकांनादेखील मोठा दिलासा मिळाला. दुपारी एक वाजेच्या सुमारास बिघाड दूर करण्यात लोको पायलट आणि रेल्वेच्या कर्मचार्यांना यश आले. हॉर्नमध्ये तांत्रिक दोष झाल्याने हा प्रकार घडल्याचे सूत्रांनी सांगितले.


