भुसावळ –
राज्य लोकसेवा आयोगाच्या सर्व रिक्त जागा भरण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळ अधिवेशनात केली होती. मात्र अजून याबाबत राज्य शासनाकडून कार्यवाही झालेली नाही.सरकार प्रत्येक बाबतीत उदासीनता दाखवत आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या पदभरती न झाल्यामुळे अनेक उमेदवारांचे भवितव्य टांगणीला आहे. अनेक उमेदवारांचे वय वाढून गेलेली आहे. त्यामुळे ते वयोमर्यादेत सुद्धा बसणार नाहीत. तशात मराठा आरक्षणाचा सुद्धा प्रश्न उपस्थित झालेला आहे.आता तरी महाविकास आघाडी सरकारने वेळकाढूपणा बंद करून, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या पदभरती मध्ये वयोमर्यादा शिथिल करून महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या रिक्त जागा त्वरित भराव्यात, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते शिशिर जावळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केली आहे.

पत्रकात शिशिर जावळे यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रराज्य लोकसेवा आयोगाच्या कारभाराला कंटाळून स्वप्नील लोणकर या गुणवंत विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना घडल्यानंतर विधिमंडळ अधिवेशनात भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी याबाबत प्रश्न उपस्थित केले होते. भाजपा आमदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देतांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ३१ जुलैपर्यंत राज्य लोकसेवा आयोगाच्या सर्व रिक्त जागा भरणार अशी घोषणा केली होती. मात्र ३१ जुलैपर्यंत लोकसेवा आयोगाच्या रिक्त जागा भरण्यात आलेल्या नाहीत.
महाविकास आघाडी सरकारने वेळकाढूपणा बंद करावा आणि या जागा भरण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी. महाविकास आघाडी सरकारने विद्यार्थ्यांचे खच्चीकरण करू नये, व विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याशी खेळ करू नये व त्यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करू नये. व एमपीएससी आयोगाच्या सदस्यांची निवड करून त्वरित रखडलेली व रिक्त पदांची युद्धपातळीवर भरती करावी असेही शिशिर जावळे यांनी पत्रकात नमूद केले आहे.


