.भुसावळ | प्रतिनिधी भुसावळ शहरातील खडका चौफुली पुल परिसरात मध्यरात्री गावठी कट्टा आणि चाकूचा धाक दाखवत दुचाकीस्वारांना अडवून बेदम मारहाण करत ११ हजार ८०० रुपयांची जबरी लूट केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी तत्पर कारवाई करत दोन सराईत आरोपींना अटक केली असून, आणखी दोन साथीदारांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश दिपक तायडे (वय २५, रा. कंडारी महादेव टेकडी) आणि त्यांचा मित्र राकेश गणेश सोनवणे हे ८ जुलैच्या मध्यरात्री जळगावहून मुक्ताईनगरकडे दुचाकीने जात होते. रात्री साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास खडका चौफुली पुलाजवळ दोन दुचाकींवर आलेल्या चार तरुणांनी त्यांची दुचाकी आडवी लावून त्यांना जबरदस्तीने थांबवले. यानंतर आरोपींनी गावठी कट्टा व धारदार चाकूचा धाक दाखवत दोघांना जीवे मारण्याची धमकी दिली. चापट-बुक्क्यांनी बेदम मारहाण करून गणेश तायडे यांच्या खिशातील ११ हजार रुपये तसेच राकेश सोनवणे यांच्या खिशातील ८०० रुपये, असे एकूण ११ हजार ८०० रुपये जबरदस्तीने हिसकावून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून केशव उर्फ सोनू सुनील भालेराव (वय २३, रा. सिद्धेश्वर नगर, वरणगाव) आणि खुशाल शिवदास रूम (वय २०, रा. गडकरी नगर, भुसावळ) या दोघांना अटक केली. केशव भालेराव याच्याविरुद्ध यापूर्वी आर्म्स अॅक्ट अंतर्गत तीन गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०९(४), १२६(२), ११५(२), ३५१(२), ३५१(३), ३५२, ३(५) तसेच आर्म्स अॅक्ट कलम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार असलेल्या अन्य दोन आरोपींचा शोध सुरू असून, या घटनेमुळे मध्यरात्री प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


