भुसावळ –
जीवाला जीव लावणारी माणसं गझलेने जोडली गेली. महाराष्ट्रच नव्हे, देशभर मानमरातब मिळाला. दोन ओळींचा शेर रसिकांच्या काळजाला भिडल्यावर जेव्हा त्यांचा हुंदका दाटून येतो तेव्हा जो आनंद मिळतो तो शब्दातीत असतो. ‘सुगंधी बाग आहे ती तिला माहितीही नाही’ आणि ‘समजू नका ढगा हे साधेसुधे बियाणे, मी पेरले पिलांच्या चोचीमधील दाणे’ या दोन गझलांनी नवी ओळख दिली, अशी भावना यवतमाळ जिल्ह्यातील सवना येथील गझलकार आबिद मन्सूर शेख यांनी व्यक्त केली. भुसावळच्या जय गणेश फाउंडेशनतर्फे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांच्या मातोश्री द्वारकाबाई कालिदास नेमाडे यांच्या स्मरणार्थ ऑनलाइन व्याख्यानमाला घेण्यात आली. त्यात गुरुवारी ‘अशी बहरली माझी गझल’ या विषयावर तृतीय पुष्प गुंफताना ते बोलत होते.

प्रमुख पाहुणे म्हणून जय गणेश स्पोर्ट्स क्लबचे कार्याध्यक्ष चैत्राम पवार हे होते. कबड्डीमहर्षी स्वर्गीय अरुण मांडळकर यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत असलेल्या या उपक्रमाचे यंदा सातवे वर्ष होते. कविता व गझल विषयाला हे वर्ष समर्पित करण्यात आले, असे समन्वयक गणेश फेगडे यांनी सूत्रसंचलनातून सांगितले. तंत्रसहाय्य बालभारती अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. जगदीश पाटील, कोटेचा महिला महाविद्यालयाचे प्रा.डॉ.गिरीश कोळी यांचे लाभले. समारोप सत्रात धरणगावचे साहित्य प्रा.बी.एन.चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. ‘भुसावळच्या सांस्कृतिक चळवळ प्रवाहीत ठेवण्यासाठी द्वारकाई व्याख्यानमाला प्रेरक आहे’, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.


