भुसावळ : वेदनेचा तळ शोधण्याचं सामर्थ्य फार कमी लोकांमध्ये असते. पण ज्यांच्यात ते असते ते नवा इतिहास घडवतात. माय-बाप आयुष्याचे संचित आहे. बापाच्या काळजातून आईला वजा करता येत नाही. नर्तकी जरी असली तरी प्रत्येक बाईत आई असते हे विसरू नका. भूक लागली की मध्यान्हीचा चंद्र भाकरीसारखा दिसतो, असा संदेश सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळचे दंगलकार नितीन चंदनशिवे यांनी दिला. भुसावळच्या जय गणेश फाउंडेशनतर्फे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडेंच्या मातोश्री द्वारकाबाई कालिदास नेमाडे यांच्या स्मरणार्थ तीन दिवसीय द्वारकाई ऑनलाईन व्याख्यानमाला घेतली जाते आहे. त्यात द्वितीय पुष्प गुंफताना दंगलकार चंदनशीवे ‘वेदनेचा तळ शोधणारी कविता’ या विषयावर बोलत होते.

प्रास्ताविक उमेश नेमाडेंनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून जय गणेश ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विलास चुडामण चौधरी होते. सांस्कृतिक दूत स्वर्गीय अरुण मांडळकर यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमाचे हे यंदाचे सातवे वर्ष आहे. त्यांची उणीव या वर्षी भासते आहे, अशी भावना सूत्रसंचालन करताना समन्वयक गणेश फेगडे यांनी व्यक्त केली. तंत्रसहाय्य पुणे बालभारतीचे सदस्य डॉ.जगदीश पाटील, भुसावळच्या कोटेचा महिला महाविद्यालयाचे प्रा.डॉ.गिरीश कोळी यांचे लाभले. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी जय गणेश फाउंडेशन व जय गणेश ज्येष्ठ नागरीक संघ, जय गणेश स्पोर्ट्स क्लब यांनी सहकार्य केले.
‘पाखरांच्या चोचीमधला घास व्हावी कविता, पहिला आणि शेवटचा श्वास व्हावी कविता’ या ओळींतून दंगलकार चंदनशीवेंनी रसिकांना साद घातली. माणसाला उजेडात आणण्याचं सामर्थ्य शब्दात आहे; पण ते कसे वापरावे यासाठी डोळे उघडे ठेवायला हवे. ‘दिवाळीला घर रंगवताना रंगांचीच फार भीती वाटते मला, लोक हरामी घराचा रंग पाहून माणसाची जात ठरवतात, म्हणून मी सगळं घरच पांढरंशुभ्र केलं…मी जातीला चुना लावला आणि मी माणसात आलो’ या कवितेतून त्यांनी जातीभेदाची वेदना मांडून त्यावरचं उत्तरही दिलं
कोरोन काळात बंद झालेल्या शाळेचे मनोगत त्यांनी ‘मी तुमची शाळा बोलतेय’ कवितेतून मांडले. ‘भींती मुक्या झाल्यात फळा रूसलाय रे, खडू उमटलाच नाही कित्येक काळ ताटातुट झालीस त्यांची’ या ओळी थेट हृदयाला भिडल्या. ‘मी वेदनेचा बाजार मांडणारा माणूस नसून बाजाराच्या वेदना मांडणारा सरळ साधा कवितेचा हमाल आहे’ या कवितेतून त्यांनी कवितेची पालखी वाहून नेण्याचा आनंद असल्याचे अधोरेखीत केले. ‘पांडुरंगा’ या कवितेतून शेतकरी आत्महत्या हा संवेदनशील विषय ताकदीने मांडण्याचा प्रयत्न केला.
मध्यान्हीचा चंद्र भाकरीसारखा दिसतो
तमाशाशी माझं जवळचं नातं आहे. भूक लागली म्हणजे मध्यान्हीचा चंद्र दूरवर आता भाकरीसारखा दिसू लागतोअसं सांगत चंदशीवे यांनी ‘तमाशा’ नावाची कविता सादर केली. त्यातील ‘मस्तावलेल्या नजरांना नजर भिडते अंधारात, मोगर्याचे चांदणे माळते मी वेणीच्या अंबरात’ व ‘तमाशाच्या फडामध्ये पायात घुंगरू बांधून आयुष्यभर नाचणार्या बाईत मला आई दिसते’ या ओळी रसिकांच्या थेट हृदयाला भिडल्या.
उद्या तृतीय पुष्प आबीद शेख गुंफणार
तीन दिवसीय द्वारकाई ऑनलाइन व्याख्यानमालेचे समारोपाचे तृतीय पुष्प 29 जुलै रोजी सवना (जि.यवतमाळ) येथील गझलकार आबीद मन्सूर शेख हे सकाळी 10.30 वाजता झूम मिटिंगद्वारे गुंफतील. ‘अशी बहरली कविता’ हा त्यांचा विषय आहे.


