भुसावळ :
बकरी ईदच्या दिवशी गुरांची कत्तल रोखण्याच्या अनुषंगाने पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या नेतृत्वात रविवारी सायंकाळी शहरातील जाम मोहल्ला, गौसीया नगर व मिल्लत नगर भागात पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवत सात गुरांची सुटका केली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, पोलिसांना या परीसरात 14 गुरे मालकांकडे 21 गोवंश जातीचे जनावरे आढळली असून पोलिसांनी संबंधित गुरे मालकांना भादंवि 149 अन्वये नोटीसा बजावल्या आहेत. बकरी ईदनंतरही पोलिसांकडून ही जनावरे तपासली (चेक) जाणार असून गुरे न आढळल्यास कायदेशीर गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे पोलीस उपअधीक्षक वाघचौरे यांनी गुरे मालकांना बजावले. पोलिसांनी केलेल्या या कारवाईने शहरात खळबळ उडाली आहे.
पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या नेतृत्वात रविवारी सायंकाळी शहरातील जाम मोहल्ला, गौसीया नगर व मिल्लत नगर भागात कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. त्यासाठी पोलिसांच्या तीन स्वतंत्र टीम गठीत करण्यात आल्या. पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, सहा.निरीक्षक मंगेश गोंटला व सहा.निरीक्षक अनिल मोरे, सहा.निरीक्षक गणेश धुमाळ, बाजारपेठ पोलीस ठाण्यातील डीबी स्टाफ तसेच आरपीपी प्लाटून घेवून पोलिसांनी या भागात कोम्बिंग राबवूत घरांची झडती घेतली. यावेळी सात गुरे कत्तलीच्या उद्देशाने लपवून ठेवल्याचे निदर्शनास येताच त्यांची सुटका करून या गुरांची जळगावच्या गो शाळेत रवानगी करण्यात आली. तर कोम्बिंग दरम्यान 14 गुरे मालकांनी घराबाहेर 21 गोवंश बांधल्याचे आढळल्याने पोलिसांनी या संदर्भात चौकशी केली असता ही पाळीव जनावरे असल्याचे गुरे मालकांनी सांगितल्यानंतर संबंधिताना 149 अन्वये नोटीसा बजावण्यात आल्या.
बकरी ईद झाल्या नंतरही गुरांची तपासणी करण्यात येईल, त्यानंतर गुरे न दिसल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा यावेळी पोलीस उपअधीक्षक वाघचौरे यांनी दिला.
कत्तलीच्या उद्देशाने गुरे आणणार्या संशयित आरोपीत सैय्यद निहाल सैय्यद जहीर (37), चाँद शहा हुसेन शहा (48), मोहम्मद आबीद अब्दुल सत्तार (42), मुसा फकिरा पिंजारी (50), अल्लाउद्दीन शेख शेरोद्दीन (43), आरीफखान शफीयारखान (42), शेख रफीक शेख कालू (50, सर्व रा.गौसीया नगर) या सात जणांविरोधात पोलीस कॉन्स्टेबल श्रीकृष्ण खंडेराव देशमुख यांच्या फिर्यादीनुसार बाजारपेठ पोलिसात रविवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.
तपास हवालदार जितेंद्र पाटील करीत आहेत.



