भुसावळ (प्रतिनिधी )-

येथील भुसावळ कला, विज्ञान व पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय, भुसावळ येथे इतिहास विभागातर्फे “भारतीय इतिहासातील कर्तृत्ववान महिला“ या विषयावर एक दिवसीय online कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सौ. एम. व्ही.वायकोळे अध्यक्ष म्हणुन उपस्थित होते तर उदघाटक म्हणुन भालोद महाविद्यालयातील डॉ. दिनेश महाजन हे उपस्थित होते. त्यांच्या समवेत उपप्राचार्य डॉ. एस. व्ही. पाटील, डॉ. बी. एच्. बऱ्हाटे, डॉ. एन. ई. भंगाळे, डॉ ए. डी. गोस्वामी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उदघाटन समारंभ संपन्न झाल्यानंतर अध्यक्ष प्राचार्य डॉ सौ. एम. व्ही.वायकोळे यांनी उदघाटन समारंभाचा अध्यक्षिय समारोप केला. त्यात त्यांनी राजमाता जिजाबाई, महाराणी ताराबाई, अहिल्याबाई होळकर, राणी लक्ष्मीबाई आदी. इतिहासातील कर्तृत्ववान महिलांचा उल्लेख करून प्राचीन काळापासून भारतीय संस्कृती मध्ये महिलांना अनन्य साधारण महत्व आहे., यावर प्रकाश टाकला.
उद्घाटन समारंभ संपन्न झाल्यानंतर प्रथम सत्रात प्रा. डॉ. दिनेश महाजन, (इतिहास विभाग प्रमुख ,कला व विज्ञान महाविद्यालय भालोद ता.यावल , जि. जळगाव )- यांनी ‘वारूताई दास्ताने यांचे स्वातंत्र्य चळवळीतील कार्य’ यावर भाष्य केले. त्यात त्यांनी आपण भुसावळ शहरातील रहिवाशी असून कितीतरी नागरिकांना भुसावळ येथील विठ्ठल मंदिर वार्डातील दास्ताने वाड्यात ॲड. अण्णासाहेब दास्ताने आणि त्यांच्या सौ. वारूताई दास्ताने यांचे वास्तव्य होते आणि स्वातंत्र्य चळवळीत त्यांचा मोलाचा वाटा होता हे माहीत नाही ही खेदजन्य बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली.
त्यानंतर वारूताई यांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान, लो. टिळकांसोबतचा सहवास, म. गांधी यांनी दास्ताने वाड्याला दिलेली भेट व भेटी पोटी म. गांधींनी ताईंना स्वातंत्र्य चळवळीसाठी त्यांच्या अंगावरील मागितलेले सोने, त्यांनी क्षणाचाही विलंब न करता दागिने मंगळसूत्रासह गांधीजींना काढून दिले. यावरून वारूताई यांचे स्वातंत्र्य चळवळीतील अर्पण केलेले तन -मन -धन याची कल्पना आपल्याला येते, अशी माहिती त्यांनी या प्रसंगी दिली.
दुसऱ्या सत्रात ’सावित्रीबाई फुले एक व्यक्तिमत्व व आदर्श‘ या विषयावर प्रा. डॉ. ए. एम. काळबांडे (इतिहास विभाग प्रमुख, सार्वजनिक कला व वाणिज्य महाविद्यालय विसरवाडी ता. नवापूर जि .नंदूरबार)- यांनी मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी सावित्रीबाईचा जीवनपट उलगडून मांडला. या काळात महिलांना घराच्या बाहेर जाण्याची परवानगी नव्हती, चुल आणि मुल एवढेच त्यांचे कार्य होतें. त्या काळात आपल्या पतीच्या खांद्याला -खांदा लावून महिलांसाठी शिक्षणाची दारे उघडुन दिली. तसेच इतर कोणत्याही प्रकारच्या दुष्काळाची हानी भरून निघेल पण विचारांची हानी भरून निघणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
शेवटच्या सत्रात प्रा डॉ. दिपक शिरसाट ( इतिहास विभाग ) भुसावळ कला, विज्ञान व पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय, भुसावळ यांनी – गोवा मुक्ति आंदोलनात सुधा जोशी यांचे योगदान
या विषयावर भाष्य केले. त्यात त्यांनी 1947 मध्ये भारत देश ब्रिटिश जुलमी सत्तेतून स्वतंत्र झाल्यानंतर गोवा हा प्रदेश स्वतंत्र झालेला नव्हता. तो पोर्तुगीजांच्या आधिपत्याखाली होता. या गोवा प्रांताला मुक्त करण्याठी गोवा मुक्ती आंदोलनात 100 पेक्षा अधिक स्रीयांनी सहभाग नोंदवला होता. त्यात सुधाताई जोशी यांचे कार्य वाखाण्याजोगे आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
त्यानंतर कार्यशाळेचा समारोप समारंभ संपन्न झाला. समारोप प्रसंगी अध्यक्ष म्हणुन उपप्राचार्य डॉ ए. डी. गोस्वामी उपस्थित होते. या प्रसंगी अदनान अहमद या विद्यार्थ्याने मनोगत व्यक्त केले. त्यात त्याने असे म्हटले की, कोविडजन्य परिस्थितीत विद्यार्थांसाठी “भारतीय इतिहासातील कर्तृत्ववान महिला या एक दिवसीय online कार्यशाळेचे आयोजन करून इतिहास विभागाने बौद्धिक मेजवानी उपलब्ध करून दिल्या बदल आभार मानले.
तसेच अशाच कार्यक्रमांचे आयोजन महाविद्यालयाने करावे अशी इच्छा प्रकट केली. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ ए. डी. गोस्वामी यांनी समारोप प्रसंगी भारतीय इतिहासाचा. विचार केला तर इतिहासापासून अशा किती तरी कर्तृत्ववान महिला आहेत की, ज्यांची नोंद इतिहासात घेतली गेली नाही, त्यांची नोंद घेणे ही काळाची गरज आहे. अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. दिपक शिरसाट, प्रास्ताविक प्रा.. डॉ. प्रफुल्ल इंगोले, पाहुण्यांचा परिचय प्रा. आशिष नवघरे यांनी करून दिला तर ऑनलाईन कार्यक्रमासाठी टेक्निशियन म्हणुन प्रा. हर्षल पाटील यांनी परिश्रम घेतले.


