भुसावळ –
राष्ट्रीय महामार्गावर भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने भुसावळातील दोघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला. माळी भवनाजवळील उड्डाणपुलावर रविवारी रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातानंतर अज्ञात वाहन चालक पसार झाला. दरम्यान, महामार्गावर अपघातांचे सत्र कायम असून चार दिवसांपूर्वीच भुसावळातील सिंधी कॉलनीतील भावंडाचा साकेगावजवळ अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली असतानाच रविवारी पुन्हा अपघात झाल्याने ग्रीन पार्क भागात शोककळा पसरली. अपघातातील मयत रेल्वेत गँगमन असल्याचे समजते.
भुसावळातील दोघा तरुणांचा अपघाती मृत्यू
समजलेल्या माहितीनुसार, साकेगावकडून भुसावळच्या दिशेने भुसावळातील तरुण दुचाकी (एम.एच.19 सी.टी.1102) ने येत असताना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने अल्ताउद्दीन बशिरोद्दीन शेख (24) व शेख शरीफ शेख इद्रीस (25, दोन्ही रा.ग्रीन पार्क, भुसावळ) या तरुणांचा मृत्यू झाला. अज्ञात वाहनाने इतकी जोरदार धडक दिली की दुचाकीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. अपघातानंतर अज्ञात वाहन चालक पसार झाला.
माळी भवनापासून काही अंतरावर उड्डापणपुलावर रविवारी रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास अपघात झाल्यानंतर वाहतूक ठप्प झाली दरम्यान बाजारपेठचे निरीक्षक दिलीप भागवत, सहा.हरीष भोये, सहा.निरीक्षक मंगेश गोंटला, सहा.निरीक्षक अनिल मोरे, रवींद्र बिर्हाडे, दीपक पाटील, समाधान पाटील, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी, प्रशांत सोनार, कृष्णा देशमुख, चालक अय्याज सैय्यद आदींनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली
तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवले. घटनास्थळी नगरसेवक पिंटू कोठारी, पिंटू ठाकूर, शेख आरीफ गनी आदींनी धाव मृतदेह पालिका रुग्णालयात हलवण्याकामी मदत केली.
महामार्ग सुरू मात्र पथदिवे बंद
अपघात ज्या ठिकाणी झाला त्या भागात पथदिवे बंद असल्याने वाहनधारकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रीय महामार्गवरील अपघातांचे सत्र कायम आहे.



