भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या सर्वच रस्त्याची दुरवस्था झाली आहे. चौपदरीकरणादरम्यान रस्त्यांची कामे अत्यंत संथ गतीने सुरू आहेत. काही ठिकाणी खोदकाम करून दोन ते तीन महिने उलटून गेले तरी, पुढील काम सुरू केले जात नसल्याने वाहनचालकांसह परिसरातील रहिवासी त्रस्त झाले आहेत. खोदण्यात आलेल्या रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल खड्ड्यामुळे दररोज अनेक अपघात होत आहेत म्हणून भुसावळ शिवसेनेतर्फे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली होती. याबाबतीत कार्यवाहीसाठी राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह यांना मुख्यमंत्री कार्यालयातुन सूचना दिल्या आहेत.
प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना वारंवार सूचना देऊन सुद्धा उपायोजना करण्यात आलेल्या नसून अपघातांचे प्रमाण वाढत चाललेले आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा संघटक विलास मुळे, उपजिल्हाप्रमुख ऍड. श्याम श्रीगोंदेकर, कार्यालयीन उपजिल्हाप्रमुख प्रा.उत्तम सुरवाडे, तालुकाप्रमुख समाधान महाजन, विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे, तालुका संघटक प्रा.धिरज पाटील, शहरप्रमुख निलेश महाजन, शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे व इतर पदाधिकारी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे.
मार्च महिन्यात खोदकाम केले पण, त्यानंतर अत्यंत संथपणे रस्त्यांचे काम होत आहे. अर्धवट कामामुळे नागरिक त्रस्त आहेत. हे कामे तातडीने पूर्ण करावे अन्यथा नागरिकांसमवेत आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही. संथ गतीने होणाऱ्या या कामास पूर्णत: महामार्ग प्राधिकरण प्रशासन जबाबदार आहे.

- संतोष सोनवणे, विधानसभा क्षेत्रप्रमुख, भुसावळ
खड्यांचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खोदकामामुळे रस्त्यावरून वाहन चालविणे अवघड झाले असून रस्त्याचे काम केव्हा पूर्ण होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सुरक्षा कोठडा नसल्याने शेख जावेद यांची गाडी खड्ड्यात पडली, त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. नुकसानभरपाईसह उपचाराचा खर्च महामार्ग प्राधिकरणाने देणे अपेक्षित आहे.
- प्रा.धिरज पाटील, शिवसेना तालुका संघटक, भुसावळ


