जामनेर (प्रतिनिधी)
मध्यरात्रीच्या सुमारास घराला लागलेल्या भीषण आगीत पती-पत्नीचा होरपळून मृत्यू झाल्याची हृदयदायक घटना जामनेर तालुक्यातील गारखेडा बुद्रुक येथे घडली. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत असे की, गारखेडा बु. येथील उत्तम श्रावण चौधरी (वय ४५) व त्यांच्या पत्नी वैशाली उत्तम चौधरीं (वय ४०) हे घरात झोपलेले असताना काल दिनांक १० मे रोजी मध्यरात्री त्यांच्या घरात भीषण आग लागली. भुसावळ जामनेर रस्त्यावरुन जात असलेल्या ट्रकचालकास घरातून धूर निघताना दिसल्यानंतर त्या ट्रक चालकाने ग्रामस्थांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर, ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. घराचा दरवाजा आतून बंद असल्याने घरात प्रवेश करण्यास त्यांना त्रास झाला. अखेर, स्थानिकांच्या मदतीने ग्रामस्थांनी घराचा दरवाजा तोडला असता, समोरील वेदनादायी चित्र पाहून सर्वांचेच मन हेलावले. या आगीत पती-पत्नीचा होरपळून मृत्यू झाला. दरम्यान, चौधरी यांना विवाहीत मुलगी व एक मुलगा आहे.



