जळगाव –

तालुक्यातील कंडारी गावात कोविड नियंत्रणासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत कुटुंब सर्वेक्षण करण्यात येत आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनेनुसार कोविड -19 नियंत्रणासाठी व मृत्युदर कमी करण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी कोरोनामुक्त महाराष्ट्र ही मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहे. ही मोहीम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ग्रामीण भागात काम करणारे आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, शिक्षक, गावातील स्वयंसेवक या सर्वांचा या मोहिमेत सहभाग घेण्याचे सुचित करण्यात आले होते. त्यानुसार जळगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी आदेश काढून प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गावनिहाय पथके तयार केली आहेत. त्यानुसार नशिराबाद प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत जळगाव तालुक्यातील कंडारी येथे गेल्या आठवडाभरापासून कुटुंब सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत आहे. आरोग्य व शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनाखाली आशा वर्कर भारती सुभाष पाटील, अंगणवाडी सेविका मंगला प्रकाश कुंभार, जि.प. शिक्षक विनोद निवृत्ती जयकर, स्वयंसेवक सुभाष पाटील, आशा वर्कर वैशाली शशिकांत सुर्वे, अंगणवाडी सेविका भारती प्रदीप सुर्वे, जि.प. शिक्षक डॉ. जगदीश लक्ष्मण पाटील, स्वयंसेविका आशा वर्कर संगीता देशमुख यांचा या पथकात सहभाग आहे. घरोघरी जाऊन ग्रामस्थांची पल्स मीटरने तपासणी करणे, लस घेतलेले व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, कोरोनाबाधित रुग्ण यासह विविध बाबींची माहिती घेतली जात आहे. या पथकास गावातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून त्यामुळे कोविड नियंत्रणाबाबत जनजागृती होण्यास मदत होत आहे.


