भुसावळातील हेमंत पैठणकर याच्यासह अन्य दोन अशा तिघांच्या टोळीला जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मुंडे यांनी जळगाव जिल्ह्यातून एक वर्षासाठी केले हद्पार ; पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिले प्रस्ताव ; तिघांवर गंभीर गुन्हे

भुसावळ –
संघटीत टोळी तयार करून घातक शस्त्रे, तलवार जवळ बाळगून लोकांना धमकावणे, ठार मारण्याचा प्रयत्न, मारहाण, चोरी, बळजबरीन घरांमध्ये प्रवेश, लोकांच्या मालमत्तेची जाळपोळ आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे असलेल्या हेमंत जगदीश पैठणकर याच्यासह अन्य दोन अशा तिघांच्या टोळीला जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मुंडे यांनी जळगाव जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्पार केले.

गुन्हेगारीमुळे राज्यभरात बदनाम झालेल्या भुसावळातील गुन्हेगारी तीन महिन्यात थोपवण्याचे आश्‍वासन पदभार घेतानाच पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी देत गुन्हेगारांचा डाटा तयार करून हद्दपारीचे प्रस्तावही तयार केले या शिवाय तत्कालीन पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांच्या काळातही पाठवण्यात आलेल्या प्रस्तावानंतर पोलिस अधीक्षकांनी गुन्हेगारीचा बीमोड करण्यासाठी अ‍ॅक्शन घेतली आहे. पहिल्या टप्प्यात भुसावळातील पैठणकर टोळी एक वर्षांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आली पोलिसांनी संबंधितांना हे आदेश बजावले.
जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीण डॉ.मुंढे यांनी टोळी प्रमुख हेमंत जगदीश पैठणकर (वय 26, रा.गरूड हॉस्पीटलजवळ, भुसावळ), चेतन उर्फ गोल्या पोपट खडसे (वय 28, रा.हनुमान नगर, भुसावळ) व तिसरा प्रशांत उर्फ मुन्ना संजय चौधरी (वय 28, रा.पंढरीनाथ नगर, भुसावळ) यांना वर्षभरासाठी हद्दपार करण्याबाबत आदेश काढले असून संबंधितांना नोटीसा बुधवारी बजावण्यात आल्या.
हद्दपार हेमंत पैठणकरविरुद्ध खंडणी, जबरी चोरी, लूट यासह नऊ गुन्हे दाखल आहेत तर चेतन खडसे विरूध्द हाणामारी, आर्म अ‍ॅक्ट, मारामारी आदी प्रकरणी तीन तसेच प्रशांत चौधरीविरूध्द दरोडो, खूनासहीत दरोडा टाकणे, हाणामारी करणे, चोरी, लूट आदी प्रकाराचे 11 गुन्हे दाखल आहेत. बाजारपेठचे तत्कालीन निरीक्षक दिलीप भागवत यांनी 10 नोव्हेबर 2020 या दिवशी अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणार्‍या टोळीविरुद्ध कारवाईबाबत हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता. संबंधितांचे म्हणणे जाणून घेतल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी वर्षभरासाठी हद्दपारीचे आदेश काढले तर बुधवारी सहा.पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस निरीक्षक अनिल मोरे, अनिल पाटील, विकास सातदिवे यांनी तिघांना नोटीस बजावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *