भुसावळ (प्रतिनिधी )-
कोविड -19 साथीच्या रोगासंदर्भात एमईआरसीने दिलेल्या सावधगिरीच्या उपाययोजना व मार्गदर्शक सूचनांनुसार, मीटर रीडिंग, चाचणी, बिल वितरण बंद करण्यात आले होते. या परिस्थितीमुळे माहे एप्रिल व मे-20 मध्ये सर्व ग्राहकांना सरासरी बिले दिली गेली. परंतु, मिशन बिगिन अगैन सुरू झाल्यानंतर माहे जून-20 पासून महावितरणने ग्राहकांचे मीटर रीडिंग घेण्यास सुरूवात केली त्यानंतरही भुसावळातील अनेक ग्राहकांना फेब्रुवारी 2021 च्या देयकात मागील 22 महिन्यांची सरासरी रक्कमेची अतिरिक्त देयके प्राप्त झाली. श्रीनगर, भोईनगर, विद्यानगर, महालक्ष्मी नगर, भुसावळ हायस्कूल परिसरातील ग्राहकांनी शिवसेनेकडे या सर्व तक्रारी दाखल केल्या. शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार चंद्रकांत पाटील, उपजिल्हा संघटक विलास मुळे, उपजिल्हाप्रमुख ऍड. श्याम श्रीगोंदेकर, कार्यालयीन उपजिल्हाप्रमुख प्रा.उत्तम सुरवाडे, तालुकाप्रमुख समाधान महाजन, विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरप्रमुख निलेश महाजन, शहर प्रमुख बबलू बऱ्हाटे यांच्या सहकार्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांशी तालुका संघटक प्रा.धिरज पाटील यांनी चर्चा करून पाठपुरावा सुरू केला.
अश्या प्रकाराने झाली दुरुस्ती:
भोईनगर येथील काशिनाथ भोई यांचे 25030 रुपयांचे देयक 11000 रुपये, विद्यानगर येथील लक्ष्मण चौधरी यांचे 32330 रुपयांचे देयक 7580 रुपये, भुसावळ हायस्कूलजवळील रमेश कोलते यांचे 2290 रुपयांचे देयक 1500 रुपये, श्रीनगर येथील अरुण तळेले यांचे 15050 रुपयांचे देयक 3000 रुपये, महालक्ष्मीनगर येथील शशि महाजन यांचे 14500 रुपयांचे देयक 5000 रुपये अशी दुरुस्त करण्यात आली. अनेक तक्रारी प्रलंबित आहेत.
शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश:
परिसरातील नागरिकांच्या समस्या महावितरणच्या अधिकाऱ्यांसमोर शिवसेनेच्या वतीने मांडण्यात आल्या व अनेक ग्राहकांना दिलासा मिळाला. रितसर पद्धतीने मीटर वाचन आणि देयक वाटप केले नाही म्हणून या तक्रारी निर्माण झाल्या आहेत, मीटर वाचन एजन्सीला दंड करावा अन्यथा महावितरण विरोधात आंदोलन पुकारले जाईल अशी भूमिका ग्राहकांनी घेतली आहे.
मध्यवर्ती कार्यालयात संपर्क साधावा:
दुरुस्ती झाल्यानंतर देयकाच्या रक्कमेत 50 टक्के फरक आढळून आला आहे, ग्राहकांनी देयके अचूक तपासून घ्यावीत. भुसावळातील विज ग्राहकांना देयकाबाबतीत तक्रारी असल्यास जामनेर रोडवरील मोटूमल चांदवानी चौक येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन भुसावळ शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने प्रसिध्दी प्रमुख गोकुळ बाविस्कर यांनी केले आहे.



