भडगाव –
एकाच विहिरीत आईसह दोन लेकरांचा मृतदेह तरंगताना आढळून आला. ही घटना बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास कनाशी शिवारात त्यांच्या स्वत:च्याच शेतात घडली. गायत्री दिनेश पाटील ( ४३), तिचा मुलगा खुशवंत (१० ) मुलगी भैरवी ( ८ ) अशी या मृत आई व मुलांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार , गायत्री ही दोन्ही मुलांसह कनाशी शिवारात असलेल्या आपल्या शेतात गेली होती. सायंकाळी महिला व मुले घरी न परतल्याने शोधाशोध सुरु झाली. त्यावेळी काही जण शेतात पोहचले असता त्यांना विहिरीत तीनही जणांचे मृतदेह तरंगताना आढळून आले. त्यांना लागलीच भडगाव ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
कनाशी येथील पोलीस पाटील अनिल सुरेश पाटील यांच्या खबरीवरून भडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रात्री ११:३० वा गायत्रीचे आई- वडिल व नातलग भडगाव येथे पोहचले. त्यांनी आपली मुलगी आणि नातूंचे मृतदेह पाहताच त्यांनी एकच टाहो फोडला.


