भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील प्रभाग 24 ब च्या नगरसेविका सोनल महाजन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे या जागेसाठी आता पोटनिवडणूक होणार असून आता प्रारुप मतदार यादीचा कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करुन मार्चचा अखेरचा आठवडा किंवा एप्रिल महिन्यात पोटनिवडणूक होण्याचा अंदाज आहे. एका प्रभागाची ही पोटनिवडणूक पालिका सार्वत्रिक निवडणुकीची लिटमस टेस्ट ठरणार आहे. पालिकेची सार्वत्रिक निवडणूक नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणार आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे हे भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये गेल्यामुळे आगामी पालिका निवडणूक अधिक रंगदार होईल. माजी मंत्री खडसे व माजी आमदार संतोष चौधरी या निवडणुकीत एकत्र येतील काय? भाजपचे आमदार संजय सावकारे भाजपला बहुमतात आणण्यासाठी काय खेळी खेळतील आदी सर्व व्यूहरचनेची लिटमस टेस्ट प्रभाग 24 ब च्या पोटनिवडणूकीत पहायला मिळणार आहे.



