उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा

जळगाव – उर्दू माध्यमांच्या जिल्हा परिषद, नगरपरिषद, महानगरपालिका तसेच खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमधील इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम तालुकास्तरावर आणि त्यानंतर जिल्हास्तरावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था तथा डायट जळगाव यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे यांनी वक्तृत्व स्पर्धेबाबत जिल्हाभरातील गटशिक्षणाधिकारी यांना पत्र पाठवले आहे. या पत्रानुसार इयत्ता पाचवी ते सातवी हा प्रथम गट असून इयत्ता आठवी ते दहावी हा द्वितीय गट आहे. दोन्ही गटांसाठी वेगवेगळे विषय देण्यात आलेले आहे. 2 फेब्रुवारी रोजी भुसावळ, यावल, पारोळा व जामनेर येथे, 3 फेब्रुवारी रोजी अमळनेर, एरंडोल, धरणगाव व मुक्ताईनगर येथे, 4 फेब्रुवारी रोजी चोपडा, जळगाव ग्रामीण, पाचोरा व चाळीसगाव येथे आणि 5 फेब्रुवारी रोजी भडगाव, महानगरपालिका जळगाव, आणि रावेर येथे या वक्तृत्व स्पर्धा पार पडत आहेत. तालुकास्तरावर प्रथम आलेल्या स्पर्धकांची स्पर्धा जिल्हास्तरावर होणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीसासह प्रमाणपत्र आणि सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धा यशस्वितेसाठी प्राचार्य डॉ. अनिल झोपे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिव्याख्याता डॉ. राजेंद्र महाजन, सय्यद अल्ताफ अली यांच्यासह गटसाधन केंद्रातील विषयतज्ञ व साधनव्यक्ती समन्वयक परिश्रम घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *