विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन, चिकित्सक वृत्ती असावी – डॉ.ए.एस.पाटील ; प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात विज्ञान मंडळाचे उद्घाटन ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
आजचे युग हे खूप स्पर्धेचे असून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन, चिकित्सक वृत्ती असणे खूप आवश्यक आहे. उत्तम व सुजाण नागरीक विज्ञानामुळे तयार होतो, विज्ञानामुळे प्रज्ञावंत व गुणवंत विद्यार्थी घडवला जातो. विद्यार्थ्यांनी ओपन माईंडेड असायला हवे आणि आपल्या कल्पना डोक्यातील कल्पना समाजापुढे मांडायला शिकले पाहिजे. जर आपल्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन नसेल तर अनेक ढोंगी किंवा संधीसाधू लोक समाजाला वेड्यात काढतात आणि त्यामुळे अंधश्रद्धेला बळकटी मिळते, असे विचार ऐनपूरच्या सरदार वल्लभाई पटेल महाविद्यालयाचे डॉ.ए.एस.पाटील यांनी येथे व्यक्त केले. शहरातील श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात दिनांक नुकतेच विज्ञान मंडळाचे उद्घाटन डॉ.पाटील यांच्याहस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते.
कोरोनामुळे फायदा व तोटाही
डॉ.पाटील म्हणाले की, ज्याप्रमाणे नाण्याच्या दोन बाजू असतात त्याच प्रमाणे कोरोनाच्यादेखील दोन बाजू आहेत. कोविडमुळे तोटे झालेले आहेत त्याचप्रमाणे त्याचे फायदे सुद्धा आपल्याला झाले आहेत. कोरोनाची सकारात्मक बाजू जर बघितली तर लॉक डाऊनच्या काळात हवेचे प्रदूषण खूप कमी झाले आहे. समुद्र, तलाव स्वच्छ करायला करोडो रुपये लागले असते पण हे एका न दिसणार्‍या विषाणूमुळे सर्व स्वच्छ झाले आहे. रस्त्यावरील वाहतूक कमी झाल्यामुळे अपघाताचे प्रमाण सुद्धा घटलेले आहे, कुटुंबाला जास्त वेळ देता येत आहे, स्वच्छता पाळली जात आहे त्यामुळे आजाराचे प्रमाण सुद्धा कमी झाले आहे, असेही ते म्हणाले.
मनाला योग्य दिशा न मिळाल्यास वळते ते अंधश्रद्धेकडे
अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर जे.व्ही.धनवीज यांनी सांगितले की, आपले मन हे शेती प्रमाणे असते. ज्याप्रमाणे शेतीचा गुणधर्म हा काहीतरी उगवण्याचा आहे तसेच आपण शेतीची योग्य मशागत केली तरच पीक उगवेल नाही तर तण (गवत) उगवेल त्याचप्रमाणे आपल्या मनाचे सुद्धा आहे. जर आपण मनाला योग्य दिशा दिली नाही तर मन अंधश्रद्धेकडे वळते. त्याकरीता वैज्ञानिक दृष्टिकोन असणे खूप आवश्यक आहे. वैज्ञानिक दृष्टीकोन नसेल तर आपला विकास शक्य नाही, समाजामध्ये ज्या अंधश्रद्धा आहे त्याला विज्ञानाचे मापदंड लावून विचार करायला पाहिजे तरच विद्यार्थी उद्याचे वैज्ञानिक होऊ शकतात त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपला सर्वांगीण विकास विज्ञान मंडळाच्या सहाय्याने करून घ्यायला हवा, असे मत त्यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक विज्ञान मंडळाचे प्रमुख प्रा.संदीप नेतनराव यांनी तर आभार समिती सदस्य डॉ.जे.एस.धांडे यांनी मानले. कार्यक्रमात महाविद्यालयातील विज्ञान विभागातील बहुसंख्य प्राध्यापक-प्राध्यापक व विद्यार्थिनी ऑनलाइन उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *