भुसावळ (प्रतिनिधी )-
शहराला नजिक साकेगाव हद्दीत येणार्या जळगाव रोडवरील गोदावरी नगर परीसरात गटारींची व्यवस्था नसल्याने नागरीक त्रस्त झाले आहेत. सुमारे १० ते १२ वर्षांपासून साकेगाव ग्रामपंचायतीकडे तक्रारींचा रेटा लावल्यानंतरही विकासकामे करण्याबाबत दखल घेतली जात नसल्याचा या भागात राहणार्या सुशिक्षीत नागरीकांचा आरोप आहे. गेल्या पाच वर्षात प्रचंड लोकवस्ती वाढली असलीतरी साध्या गटारींची समस्या सोडवण्यात न आल्याने सांडपाणी साचल्याने नागरीकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती आहे. साकेगावातील ग्रामपंचायतीच्या लोकप्रतिनिधींशी याबाबत समस्या मांडल्यानंतर विकासकामांसाठी निधी नसल्याचे उत्तर दिले जात असल्याचे नागरीकांचे म्हणणे आहे.
समस्या सोडवण्याची अपेक्षा
साकेगाव ग्रामपंचायतीची वॉर्ड पुनर्रचना करून वाढीव हद्दीतील भागातील लोकांचे मतदान सहभागी करून घ्यावे किंवा नवीन ग्रामपंचायतीसाठी प्रयत्न करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या परीसरात ज्या बांधकाम व्यावसायीक प्लॉट घेवून घरे बांधून विकली त्यांनी गटारींचा प्रश्न सोडवणे गरजेचा असताना त्यांनी रीकाम्या प्लॉटमध्ये सांडपाणी वळवल्याने आता त्या सांडपाण्यातून दुर्गंधी सुटत डास-मच्छरांचा उपद्रव वाढला आहे. लोकप्रतिनिधींनी दखल घेवून समस्या सोडवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



