भुसावळ (प्रतिनिधी ) –
जिल्ह्यातील सर्वात मोठ्या आणि जिल्ह्यासाठी सिंचन व बिगर सिंचनाच्या क्षेत्रातील महत्त्वाच्या अशा हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शनिवारी दिवसभरात दमदार पाऊस झाल्याने रात्री ८ वाजेच्या सुमारास हतनूर धरणाचे ३६ दरवाजे पूर्ण उघडण्यात आलेले असून त्यातून १४५२३५ क्युसेक्स इतक्या मोठ्या प्रचंड प्रमाणात पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे . त्यामुळे तापी नदी दुथळी भरून वाहत असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
शनिवार दिनांक २९ रोजी धरणाची जलपातळी २१०.३९० मीटर पर्यंत पोहचलेली असून धरणात आज रोजी २०९.६० दशलक्ष घनमीटर इतका जलसाठा शिल्लक आहे. लाॕकडाऊनमुळे यावर्षी रेल्वे , आयुध निर्माणी, दीपनगर वीजनिर्मीती केंद्र हे बंद असल्याने अशा जादा वापर असलेल्या ठिकाणी पाण्याचा वापर न झाल्याने जलसाठा मुबलक प्रमाणात शिल्लक आहे. तसेच भुसावळ, मुक्ताईनगर , बोदवड, यावल , रावेर , या तालुक्यातील ३८ हजार हेक्टरवरील शेतीला याचा लाभ होणार असल्याची माहिती हतनूर धरणाचे उपअभियंता पी.एन. महाजन यांनी दिलेली आहे.



