भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ तालुक्यातील संपूर्ण ग्रामीण भागातील दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत केल्या जाणाऱ्या कामात ग्रामसेवक , सरपंच,ठेकेदार हे बोगस कामे करून दलित वस्तीचा निधी हडप करीत असल्याचा आरोप रिपाइं आठवले गटाचे जळगाव जिल्हाध्यक्ष राजु सुर्यवंशी यांनी आज पत्रकार परीषदेत केला.ते आज दि.२ आॅगस्ट रोजी वरणगाव रस्त्यावरील संभाजी नगरातील त्यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
या प्रसंगी राजु सूर्यवंशी पुढे म्हणाले कि,दलित वस्तीची ४० टक्के कामे करून ६० टक्के निधी हडप केला जात आहे.काही कामे तर न करताच पैशांचा अपहार होत आहे.तालुक्यातील ५० ते ५५ गावांमध्ये ही साखळी संगनमताने सुरू आहे.बीडीओ सुध्दा यात सहभागी आहेत.
ज्या बेरोजगार तरूणांनी बीई,डिप्लोमा केला आहे अशा सुशिक्षित बेरोजगार मुलांची जि.प.आणि सा.बां विभागात नोंदणी करून त्यांना कामे दिली जातात मात्र तसे होत नाही .टेंडर घेण्यासाठी नमुना ७ नंबरची पावती फाडल्या नंतरच कामाचे टेंडर भरता येते.मात्र सदर पावती पुस्तक ठेकेदारांच्या घरी असतात.संगनमताने २-३ कंत्राटदार तालुक्यातील सर्व दलित वस्ती सुधार योजनेची कामे घेत आहे.याबाबत विचारले असता उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.
ग्रामसेवकाचे दप्तर ठेकेदाराच्या घरी का?असा प्रश्न उपस्थित करून राजु सुर्यवंशी यांनी या प्रकरणाची चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे .याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येईल तसेच तालुक्यात ग्रामपंचायतींना ताला ठोको आंदोलन करण्यात येणार आहे.तसेच सरकारने जर दलित वस्ती सुधार योजनेच्या बोगस कामांची चौकशी केली नाही तर रिपाई आपल्या पध्दतीने रस्त्यावर आंदोलन करेल व त्यास जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी,गटविकास अधिकारी जबाबदार राहतील असा इशाराही राजु सुर्यवंशी यांनी दिला आहे.यावेळी नगरसेवक रवी सपकाळे,गिरीष तायडे,बाळू सोनवणे,पप्पु सूरडकर,राहूल बि-हाडे,अप्पा ठाकरे,प्रविण मेहरे,जुम्मा शहा,मनोज शिंपी,युसूफ शेख आदी उपस्थित होते.



