मध्य रेल्वेने केली ९ हजार ७५५ टन जीवनावश्यक वस्तूची वाहतूक ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
भारतात कोविड-१९ या देशभर पसरलेला साथीचा आजार रोखण्यासाठी सर्व नियमित प्रवासी रेल्वे सेवा रद्द केल्या आहेत. तथापि, विशेष गाड्यां चालविण्या व्यतिरिक्त देशभरातील जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा साखळी राखण्यासाठी मालगाड्या (फ्रेट) आणि पार्सल गाड्या धावत आहेत.
मध्य रेल्वेने लॉकडाऊन दरम्यान दिनांक ५ जून २०२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, कल्याण, नागपूर, भुसावळ, सोलापूर, पुणे आणि नाशिक इ. स्थानकापासून ते नागपूर, सिकंदराबाद, चेन्नई आणि शालीमार येथे जाण्यासाठी विविध ठिकाणी ९ हजार ७५५ टन जीवनावश्यक वस्तू पार्सल गाड्यांतून पाठविल्या आहेत.
लॉकडाऊन कालावधी वाढवण्यात आल्यामुळे आणि सध्याची गरज लक्षात घेऊन शालीमार साठी पार्सल गाड्या 30 जून 2020 पर्यंत चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या लॉकडाऊन कालावधीत मध्य रेल्वेने पुरवठा साखळी कायम राखण्यासाठी ३ हजार ३३६ टन खाद्यपदार्थ / नाशवंत पदार्थ आणि ५ हजार ०८० टन हार्ड पार्सलची वाहतूक केली आहे.या साथीच्या आजारात औषधे/फार्मा उत्पादनांचा पुरवठा करणे हे देखील एक आव्हानात्मक काम होते. या लॉकडाऊन कालावधीत मध्य रेल्वेने ११५२ टन औषधं / फार्मा उत्पादनांची वाहतूक केली आहे. या विशेष पार्सल गाड्यांद्वारे झालेल्या वाहतूकीत ९७ टन पोस्टल / आरएमएस बॅग आणि ८९ टन ई-कॉमर्स उत्पादनांचा समावेश आहे. लॉकडाऊन कालावधीत केलेल्या पार्सल वाहतुकी मधून मध्य रेल्वेला ३.६४ कोटी रुपये उत्पन्न प्राप्त झाले आहे.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील पार्सल बुकिंगसाठी मध्य रेल्वेने ऑनलाईन पेमेंट सुरू केले आहे ज्यायोगे भागधारकांना आवश्यक तेवढे सामाजिक अंतर राखता येईल आणि नेट बँकिंग , आरटीजीएस , एनईएफटी , आयएमपीएस , यूपीआय मार्फत कार्यालय निवासस्थाना मधून सहज पैसे भरता येतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *