कोरोनाशी दोन हात करण्यासाठी दमलेल्या बाबाला मानसिक आधाराची कुटुंबीयांकडून गरज

मुंबई –
(प्रतिनिधी-अनंतकुमार गवई )
संपूर्ण जगाला आपल्या कवेत घेणाऱ्या कोरोना व्हायरसने सर्वानाच चिंतेत टाकले आहे. लॉकडाउनमुळे जगामधील करोडो नागरिक घरी बसले असून पुढे काय होणार या चिंतेत दिवस काढत आहेत. आजघडीला कोरोनाचे रुग्ण भारतामध्ये व प्रमुखतः महाराष्ट्रामध्ये वाढत असून हे लॉकडाउनचा कालावधी वाढलेला आहे जागतिक मंदीमुळे त्रस्त असलेला भारतीय कोरोनाच्या संकटामुळे मानसिक आजाराला बळी पडण्याची शक्यता वाढली असून कुटुंब प्रमुखाचे मानसिक आरोग्य बिघडण्याची शक्यता वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे. दमलेल्या बाबाची कविता आपल्या सर्वानाच माहित असेल पण आता या दमलेल्या बाबाचे मानसिक स्वास्थ बिघडू न देण्याची जबाबदारी त्यांच्या कुटुंबीयांवर अवलंबून आहे. याविषयी अधिक माहिती देताना बोरीवली येथील अपेक्स हॉस्पिटल समूहाचे मनोविकारतज्ञ डॉ प्रतीक सुरंदशे म्हणाले की , जेंव्हा तुमची मनस्थिती दुःखी, उदास, निराश अशी रहाते त्यावेळी मानसिक ताणतणाव वाढताना दिसतो. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावामुळे प्रगत देश हादरले असून भारतासारखा विकसनशील देश किती मागे जाणार आहे याची चिंता सर्वात जास्त कुटुंबप्रमुखाला होत आहे. कोरोनाचा प्रभाव हा फक्त आता शरीरापुरता मर्यादित राहिलेला नाही तो मनापर्यंत जाऊन पोहचला आहे. भविष्यात आपल्यापुढे काय वाढून ठेवले आहे, मुलांच्या शिक्षणाचा खर्च , घराचा ईएमआय, औषधांचा खर्च व रोजच्या जगण्यासाठी लागणारे पैसे भविष्यात कुठून आणायचे याबाबत अनेकजण चिंतेत आहेत. अशा कठीण समयी कुटुंब प्रमुखाला मानसिक ताणतणावापासून दूर ठेवायचे असेल तर त्यांच्या कुटुंबीयानी त्या कुटुंब प्रमुखाला सतत २४ तास ‘करोना’शी संबंधित बातम्यांच्या भडीमारापासून अशा व्यक्तींना दूर ठेवणे गरजेचे आहे* , तसेच त्यांच्याशी संभाषण करताना या कोरोना आजाराबाबत संभाषण टाळा त्यापेक्षा त्यांना जुन्या आठवणी काढून त्यांचे मन कसे प्रफुलीत व आनंदी राहील याची काळजी घ्या. कुटुंबप्रमुखाने भूतकाळात केलेल्या यशस्वी घटनांची आठवण करून देणे गरजेचे आहे. अशा या कठीण काळामध्ये घरातील कोणतीही व्यक्ती आजारी पडणार नाही याची काळजी घ्यावी कारण कोणताही आजार मानसिक ताणतणाव वाढवणारा आहे, तसेच या लॉकडाउन काळामध्ये घरामध्ये कोणतेही अपघात होणार नाही याची काळजी घ्या. कुटुंबाने एकत्र बसून चांगले चित्रपट पाहणे, गाणी ऐकणे, मुलांबरोबर खेळ, गप्पा यासारख्या कृतीत कुटुंबप्रमुख रमतील यासाठी प्रयत्न करा.”
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे सर्व उद्योगधंदे बंद झाले असून नोकरी, बचत किंवा मूलभूत साधने गमावण्याच्या भीतीमध्ये लोक जगत आहेत परंतु आजमितीला याबाबत चिंता न करता कोरोना या आजाराशी कसा सामना करू शकतो याबाबत सरकारी यंत्रणेचे नियम पाळणे फारच महत्वाचे आहे. यासोबतच व्यायाम, वाचन, संगीतात आपले मन रमविणे गरजेचे आहे विशेष म्हणजे सतत धावपळीच्या जगण्यातून आपल्या कुटुंबाशी तुटत चाललेला संवाद यानिमित्ताने वाढविण्याची संधी प्रत्येक कुटुंब प्रमुखाला मिळालेली आहे असेही मत अपेक्स हॉस्पिटल समूहाचे मनोविकारतज्ञ डॉ प्रतीक सुरंदशे यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *