भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील पीसी- २ क्षेत्रातील श्रीनगर, भोईनगर, गणेश कॉलनी, अष्टविनायक कॉलनी, हुडको कॉलनी, रेल दुनिया, अयोध्यानगर, खळवाडी येथील ग्राहकांना आठ ते दहा महिन्यापासून सरासरी वीज बिल तसेच काही ग्राहकांना दुसऱ्याच ग्राहकांचे वीज बिल देण्यात येत होते. शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धिरज पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रवीण नेहेते, रमेश खैरनार, अनिल लोखंडे, रवींद्र सोनवणे, लीलाधर पाटील, गजेंद्र खैरनार, अरुण तळेले, श्याम खैरनार, संदीप भोई यांनी कार्यकारी अभियंता प्रदिप घोरुडे यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार काही ग्राहकांचे वीज मीटर बदलुन दिले असून त्यांना पुढील महिन्यात सुधारित वीज बिल दिले जाणार आहे. तर अवाजवी वीज बिल आलेल्या ग्राहकांचे ३१ हजार ३१५ रुपये कमी करण्यात आले असून प्रा.धिरज पाटील यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.
संचारबंदीत नागरिकांना दिलासा: प्रा.धिरज पाटील
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असतांना नागरीकांच्या हाताला काम नाही, मिळेल त्या परिस्थितीत भागवले जात आहे. शेतकरी, हात मजूर , गाडी ड्रायव्हर, सेवा निवृत्त, जेष्ठ नागरिक ,यांना बिल भरण्यासाठी पैसा कुठून येईल याची चिंता होती, वीज बिल कमी झाल्याने नागरीकांना दिलासा मिळाला आहे, पुढील महिन्यात उर्वरित तक्रारी निकाली काढाव्यात अश्या सूचना महावितरणच्या अधिकाऱ्यांना केल्या आहे, तसेच ग्राहकांना अडचणी असल्यास शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रा.धिरज पाटील यांनी केले आहे.



