56

भुसावळ (प्रतिनिधी )-
शिक्षकदिनाचे औचित्य साधून येथील डॉ. मानवतकर बहुउद्देशीय संस्थेतर्फे गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा प्रज्ञासूर्य गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२० ने गौरव करण्यात आला. तसेच जे. टी अग्रवाल यांचा शिक्षण महर्षी पुरस्काराने सन्मान करण्यात आला. स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत जागतिक शिक्षकदिनी दिनांक ऑक्टोबर रोजी पुरस्कार प्रदान सोहळा सोशल डिस्टंसच्या नियमांचे पालन करून संपन्न झाला.
नि:स्वार्थ भावनेने ज्ञानदान आणि विद्यार्थी घडवण्याचे कार्य अविरत करीत असणाऱ्या भुसावळ तालुक्यातील जिल्हा परिषद नगरपालिका, खाजगी व शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित, सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, वरिष्ठ महाविद्यालय, तंत्र शिक्षण, अभियांत्रिकी, वैद्यकीय क्षेत्रात अध्यापनाचे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. आदर्श संस्कारक्षम पिढी कळविण्यात मोलाचा वाटा असणाऱ्या हिंदी सेवा मंडळाचे अध्यक्ष जे. टी. अग्रवाल यांना प्रज्ञासूर्य शिक्षण महर्षी पुरस्कार 2020 ने सन्मानित करण्यात आले. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी चैतन्य आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरूणा शिरीष चौधरी होत्या. विशेष अतिथी व वक्ते म्हणून बालभारतीच्या मराठी भाषा अभ्यास मंडळ सदस्य डॉ. जगदीश पाटील, सेंट्रल रेल्वे स्कूलचे प्राचार्य सतीश कुलकर्णी, डॉ. मानवतकर बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष डॉ. मधू राजेश मानवतकर, उपाध्यक्ष डॉ. राजेश मानवतकर उपस्थित होते. महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज यांनी ऑनलाईन ऑडिओ पद्धतीने शिक्षकांशी संवाद साधला. पुरस्कारार्थी प्रतिनिधी म्हणून मनोज भोसले, संध्या भोळे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मधू मानवतकर यांनी तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिशीर जावळे यांनी केले. यशस्वीतेसाठी कृपा महाजन, दामिनी पाटील, सतीश महाजन, देवेंद्र राजपूत, आर. के. कोळी, मनोज यादव, संतोष मौर्य, बाळू पाटील यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम् राष्ट्रगीताने झाली.
शिक्षकांची भूमिका महत्त्वपूर्ण – महामंडलेश्वर महंत आचार्य स्वामी जनार्दन हरीजी महाराज
शिक्षकदिनाचे औचित्य साधून डॉ. मानवतकर बहुउद्देशीय संस्थेतर्फे प्रदान करण्यात येत असलेल्या पुरस्काराच्या निमित्ताने कामाची दखल घेऊन देण्यात येणारे पुरस्कार हे जबाबदारीचे भान देत असतात. आज समाजात शिक्षकांची भूमिका महत्त्वपूर्ण असून भावी पिढीची जबाबदारी त्यांच्याच खांद्यावर असल्याचे महामंडलेश्वर महंत आचार्य स्वामी जनार्दन हरीजी महाराज यांनी ऑडिओ संदेशातून सांगितले.
क्षमता विकासासाठी अध्यापनाकडून अध्ययनाकडे – डॉ. जगदीश पाटील
वय आणि वर्ग याला अनुसरून मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांमध्ये क्षमता निर्मिती होणे गरजेचे आहे. त्यासाठी शिक्षकांची भूमिका फक्त शिकवणे एवढीच राहणार नाही तर त्यासोबतच एक समुपदेशक, क्षमता निर्मिती करणारा, कुशल व तज्ज्ञ प्रशिक्षक आणि अध्यापनाकडून अध्ययनाकडे वाटचाल करणारा अशी विविधांगी भूमिका शिक्षकांना निभवावी लागणार आहे. अध्यापन ही संकल्पना मागे पडत असून विद्यार्थी स्वतः अध्ययन करील अशी परिस्थिती शिक्षकांना निर्माण करावी लागणार आहे. समाजाचा पाया घडवण्याची जबाबदारी शिक्षकांची असल्याने संपूर्ण समाज आजही शिक्षकांकडे प्रतिष्ठापूर्वक नजरेने पाहत आहे, असे बालभारती अभ्यास मंडळ सदस्य डॉ. जगदीश पाटील यांनी सांगितले.
डॉ. मानवतकर दांपत्याचे शिक्षणप्रेम कौतुकास्पद – प्राचार्य सतीश कुलकर्णी
गेल्या वर्षापासून डॉ. मानवतकर बहुउद्देशीय प्रतिष्ठानतर्फे आयोजित प्रज्ञासूर्य गुणवंत शिक्षक पुरस्कार व प्रज्ञासूर्य शिक्षण महर्षी पुरस्कार प्रदान करण्याचे कार्य सुरू करण्यात आले आहे. वैद्यकीय सेवेबरोबरच शिक्षण सेवा करून शिक्षणाविषयीचे त्याचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्राचार्य सतीश कुलकर्णी यांनी सांगितले.
कौशल्यपूर्ण व व्यावसायिक शिक्षणावर भर – प्राचार्या डॉ. अरूणा चौधरी
शिक्षणक्षेत्रात वेगाने बदल होत आहेत. प्राथमिक ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत विद्यार्थ्यांच्या पुस्तकी ज्ञानाबरोबरच कौशल्यपूर्ण व्यवसायिक शिक्षणावर भर देण्यात येत आहे. जेणेकरून उद्याचा सक्षम व जबाबदार नागरिक तयार होऊ शकेल. त्यासाठी शिक्षकांनी देखील राष्ट्रनिर्मितीचे कार्य या दृष्टिकोनातून शिक्षकी पेशाकडे पाहावे. मूल्याधारित शिक्षण संस्कृती जोपासून आदर्श विद्यार्थी घडविणारे शिक्षक हा समाजातील अविभाज्य घटक असल्याचेही डॉ. अरूणा चौधरी यांनी अध्यक्षीय मनोगतातून सांगितले.


