खड्ड्यांमुळे भुसावळकरांचे हाल ; शिवसेनेतर्फे ५०० नागरिकांना झेंडू बाम व आयोडेक्स वाटप ; साचलेल्या पाण्यात कागदी नावा उतरवल्या ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
पावसाळा सुरू झाला आणि काही दिवसांतच सर्वच रस्त्यांवर जागोजागी जीव घेणे खड्डे व चिखल दिसू लागला आहे. हे खड्डे त्वरेने बुजवण्याचे काम भुसावळ नगरपालिकेने हाती घेण्याची इच्छा सुद्धा दाखवली नाहीय. यामुळे लोकांनी, वाहनचालकांनी ‘रस्त्यात खड्डा की खड्डयांत रस्ता’ अशी शेरेबाजी सुरू केली त्यामुळे सोमवार २४ ऑगष्ट रोजी भुसावळ शहरात शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार चंद्रकांत पाटील, तालुका प्रमुख समाधान महाजन, उपजिल्हा संघटक विलास मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर शिवसेनेच्या वतीने कागदी नावा खड्डयातील साचलेल्या पाण्यात विहार करण्यासाठी सोडण्यात आल्या.
सोशल डिस्टन्सचे पालन करीत पुढे खड्डा आहे, अपघात होऊ शकतो, वाहन सावकाश हाका अश्या सूचना प्रवाश्यांना देत झेंडू बाम व आयोडेक्स वाटप केले. तालुका संघटक धिरज पाटील, शहर प्रमुख बबलू बऱ्हाटे, विभाग प्रमुख निखिल बऱ्हाटे, दिव्यांग सेना तालुका प्रमुख फिरोज तडवी उपस्थित होते.
आरोपप्रत्यारोपात जनतेचे हाल:
फक्त प्रेस कॉन्फरन्स घेऊन जनतेच्या समस्या मार्गी लागल्या असत्या तर नगरपालिकेत नगरसेवकांचे काय काम राहिले असते. पालिका निवडणूकित इतर सर्व पक्षांना नाकारून सत्ताधाऱ्यांना जनतेने काम करण्यासाठी निवडुन दिले आहेत, त्यांनी काम करून दाखवावे. शिवसैनिक नक्कीच त्यांचा सत्कार करतील. स्थानिक खासदार, आमदार, नगराध्यक्ष, नगरसेवकांनी गाडीतून फिरण्यापेक्षा रस्त्यावरून फिरावे आणि रस्ता बनविताना तो पाच वर्षे खराब होणार नाही, याची लेखी हमी विकासकाकडून घ्यावी. अन्यथा सत्ताधाऱ्यांवर भुसावळकरांना खड्डय़ात टाकलं, आम्ही करून दाखवलं अशी म्हणन्याची वेळ येईल, सत्ताधाऱ्यांनी नगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून तरी रस्ते दुरुस्त करावे, असे शहर प्रमुख बबलू बऱ्हाटे म्हणाले.
भुसावळकरांना झेंडू बाम व आयोडेक्सच्या दिल्या बाटल्या :
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मागच्या वर्षी दोन वेळेस भुसावळात आले तेव्हा नुसत्या देखाव्यासाठी, नंतर गणेश विसर्जन व दुर्गामाता विसर्जन वेळेस खड्डे दुरुस्त केले गेले. यावर्षी समस्या जास्त वाढली तरी दुरुस्ती नाही. अपरिहार्यपणे वाहनांतून प्रवास करावा लागणा-या महिला, बालके, वयोवृद्ध महिला-पुरुष, आजारी रुग्ण, तसेच मानेची व कंबरेची व्याधी सहन कराव्या लागणा-यांना यातून प्रवास करताना आणखी हाल सोसावे लागत आहेत. भुसावळच्या सत्ताधा-यांना खड्डे कमी करता आले नाही परंतु वेदना वाढवल्या म्हणून स्वखर्चाने शिवसेना तालुका संघटक प्रा.धिरज पाटील यांनी ५०० प्रवाश्यांना झेंडू बाम व आयोडेक्स वाटले.
खड्यांना नागरिक वैतागले:
सत्ताधाऱ्यांना समाजाचं काहीही सोयरसुतक नाहीय. ‘जनता गेली खड्डयात’ असंच त्यांचं वागणं आहे. कोणता नगरसेवक कोणत्या पक्षाकडून पुढील निवडणुक लढेल यातच त्यांना रस आहे. नगरसेवक कंटाळले आहेत आणि त्यामुळेच आता वार्डात चांगले कार्य करणाऱ्या आजी माजी नगरसेवकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी पदरमोड सुरू केली आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे.
गाडी, सायकल, किंवा कारऐवजी जणू बैलगाडी चालवतोय असे वाटते. विस्तारलेल्या खड्डयांमुळे वाहनचालकांना आणि प्रवाशांवर ‘भीक नको पण कुत्रा आवर’ असे म्हणण्याची पाळी आली आहे असे नागरिक म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *