भुसावळ (प्रतिनिधी )-
आपल्या देशवासियांना स्वातंत्र्य उपभोगता यावे यासाठी स्वतःच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारे सैनिक हे आपली आण, बाण आणि शान आहेत. त्यामुळे देशातील प्रत्येकाने सैनिक व आपल्या देशाविषयीच्या भूतकाळाची जाण, वर्तमानाचे भान आणि भविष्याचे स्वप्न जपण्याची गरज असल्याचे प्रतिपादन बारावी युवकभारती मराठी पाठ्यपुस्तकातील “वीरांना सलामी” या पाठाच्या लेखिका अनुराधा प्रभुदेसाई यांनी केले.
बारावी युवकभारती मराठी भाषा अभ्यास मंडळ सदस्य डॉ. जगदीश पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या बारावी युवकभारती मराठी पाठ्यपुस्तकातील लेखक-कवी यांच्याशी ऑनलाईन संवाद या उपक्रमांतर्गत लेखिका अनुराधा प्रभुदेसाई बोलत होत्या. प्रारंभी डॉ. जगदीश पाटील यांनी चारदिवशीय उपक्रम आयोजनाचा हेतू कथन केला. प्रा. गणेश सूर्यवंशी यांनी लेखिका अनुराधा प्रभुदेसाई यांचा परिचय करून दिला. शालेय शिक्षण विभागाचे शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी हा स्तुत्य उपक्रम असून याद्वारे पाठ्यपुस्तक अधिक चांगल्या पद्धतीने उलगडले जाणार असल्याचे सांगितले. त्यानंतर लेखिका अनुराधा प्रभुदेसाई संवाद साधताना म्हणाल्या की, एक पर्यटक म्हणून लडाख येथे गेले असताना तेथील वाटेवरचा प्रवास आणि सैनिकांचे जीवन अनुभवताना अंगावर शहारे आले. आपल्या कुटुंबापासून दूर जाऊन सीमेवर देशरक्षणाचे काम करणाऱ्या तरूणांसाठी दरवर्षी 26 जुलै रोजी कारगिल दिनाचे औचित्य साधून मी त्यांना भेटायला जाते. त्यांच्यासोबत संवाद साधते. कुटुंबाच्या प्रेमासाठी अासुसलेल्या सैनिकांसोबत रक्षाबंधन साजरे करते. सैनिकांशी हृदयापासून हृदयापर्यंत पश्यंती वाणीने संवाद साधते. प्रत्येक वेळी सैनिकांच्या भेटीतून देशभक्तीची ज्वाला कायम मनात धगधगत राहते. ही देशभक्तीची ज्वाला प्रत्येक देशवासियांमध्ये धगधगत राहावी यासाठी लक्ष्य फाऊंडेशनची स्थापना केली असून सैनिकांबद्दल आदरभाव व्यक्त करणारी अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यातील “तुमच्या उद्यासाठी आपला आज देणारा सैनिक” यातून “वीरांना सलामी” या पाठाचा बारावी युवकभारती पाठ्यपुस्तकात समावेश करण्यात आला आहे. यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये भूतकाळाची जाणीव निर्माण करून त्यांना वर्तमानाचे भान ठेवायला सांगून सैनिक व देशाविषयीचे स्वप्न जपण्याचे आवाहन लेखिका अनुराधा प्रभुदेसाई यांनी केले. ऑनलाईन संवाद सत्रात महाराष्ट्रातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सूत्रसंचालन डॉ. जगदीश पाटील यांनी तर आभार महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रा. सुनील डिसले यांनी मानले.



