भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ नगरपरिषदेचे आस्थापना प्रमुख वैभव पवार यांचे शनिवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी निधन झाले. रात्री सुमारे दोन वाजेच्या सुमारास शिवपूर-कन्हाळे रोडवरील कुकरेजा सुपरमार्टजवळ हा अपघात घडला. या घटनेने भुसावळ शहरासह नगरपरिषद प्रशासनात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, वैभव पवार हे रेल्वे स्टेशनच्या दिशेने जात असताना त्यांच्या वाहनाचा शिवपूर-कन्हाळे रोडवरील कुकरेजा सुपरमार्टजवळ अपघात झाला. मध्यरात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत वैभव पवार यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. या अपघातात त्यांच्या सोबत वाहनात असलेली त्यांची बहीण गंभीर जखमी झाली आहे. अपघातानंतर त्यांना तातडीने गोदावरी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वैभव पवार यांच्या आकस्मिक निधनाची बातमी समजताच भुसावळ नगरपरिषदेतील अधिकारी, कर्मचारी, महसूल विभागातील सहकारी तसेच शहरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. नगरपरिषद प्रशासनातील महत्त्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या अधिकाऱ्याच्या निधनाने प्रशासनाची मोठी हानी झाली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे भुसावळ शहरात सर्वत्र शोक व्यक्त केला जात असून, पवार कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जखमी बहिणीच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.


