-
भुसावळ (प्रतिनिधी)- सिद्धार्थ गौतम बुद्ध यांनी भिक्खु संघाची स्थापना केली तेंव्हा हजारोंच्या संख्येने भिक्खु बौद्ध धर्माचा प्रचार , प्रसार करू लागले . त्याकाळी प्रवासाची साधनं नसल्याने ते पायी प्रवास करत असत . प्रवासाच्या वाटा या शेतांतून जात होत्या त्यामुळे भिक्खु संघास शेतातूनच जावे लागत होते , त्यांच्या प्रवासामुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान होत असे तेंव्हा शेतीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी गौतम बुद्ध यांनी पावसाळ्यात प्रवास न करता विहारात मुक्काम करण्याचे सांगितले व तिथूनच वर्षावास ( पावसाळ्यातील मुक्काम ) सुरू झाला असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ यांनी केले.
वरणगाव फॅक्टरी येथील बुद्धविहारात आयोजित वर्षावास समाप्ती कार्यक्रमात मुख्यावक्ता म्हणून भाषण करतांना वाघ बोलत होते.
जयसिंग वाघ यांनी पुढं आपल्या भाषणात सांगितले की, गौतम बुद्ध यांनी दिलेल्या शांतता , अहिंसा या तत्वांवर आपला देश चालत होता तेंव्हा आपले साम्राज्य आताच्या पाकिस्तान , बांगलादेश , म्यानमार , अफगाणिस्तान , सीरिया , इराण पर्यंत पोहचले होते पण आम्ही या देशातून बौद्ध धर्म हद्दपार केला व आम्ही सुमारे १५०० वर्ष परकियांचे गुलाम राहिलो . मात्र परकियांची गुलामगिरी नष्ट करण्या करिता आम्हाला शांतता , अहिंसा या तत्वांचाच आधार घ्यावा लागला हे आपण समजून घेतले पाहिजे .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य महा व्यवस्थापक एम. झेड. सरवर होते त्यांच्या हस्ते भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
अप्पर महा व्यवस्थापक संजय नवाले , मेजर पंडित तायडे मुख्य अतिथी म्हणून हजर होते .
सुरवातीस धम्मध्वजा रोहण करण्यात आले त्यानंतर त्रि सरण, पंचशिल ग्रहण करण्यात आले व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास वर्षावास समारोह समितीचे अध्यक्ष अजय इंगळे , सचिव आनंद मोरे , अरुणा इंगळे , भाग्यश्री मोरे , अभयश्री मोरे , मनोज पाटील , निलेश तायडे , प्रवीण पाटील , संदीप चौधरी , दीपक पाटील , धीरज तायडे , योगेश सूर्यवंशी , मयूर जावळे , शुभम भारंबे , पंकज हिरोळे , संजय मोरे , संतोष वानखेडे , राहुल बावस्कर आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमास स्त्री , पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.