यावल (प्रतिनिधी) : राज्य राखीव पोलीस दलात (एसआरपीएफ) महिला जवानांची भरती सुरू करून महिला बटालियनचे दोन स्वतंत्र गट स्थापन करावेत, तसेच महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेअंतर्गत पुण्यातील प्रमुख रुग्णालयांमधील उपचार सुविधा पूर्ववत कराव्यात, अशा विविध मागण्यांचे निवेदन पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य, जळगाव जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. रोहन घुगे यांच्यामार्फत राज्याचे गृहराज्यमंत्री (शहरे) ना. योगेशदादा रामदास कदम यांना सादर करण्यात आले. असोसिएशनच्या या मागण्यांमुळे महिला उमेदवारांना रोजगाराची संधी मिळण्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्य सुविधा उपलब्ध होण्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. एसआरपीएफमध्ये महिला भरती सुरू करण्याची मागणी केंद्र सरकारच्या सीआरपीएफ, सीआयएसएफ, बीएसएफ आणि आयटीबीपी यांसारख्या सुरक्षा दलांमध्ये महिलांची मोठ्या प्रमाणावर भरती केली जाते. या दलांमध्ये महिलांसाठी स्वतंत्र बटालियनची व्यवस्थाही आहे. मात्र, महाराष्ट्रातील राज्य राखीव पोलीस दलात महिलांची भरती आणि त्यांच्यासाठी स्वतंत्र बटालियनची व्यवस्था नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. गणेशोत्सव, दुर्गोत्सव, महापुरुषांच्या जयंती, निवडणूक बंदोबस्त तसेच अन्य कायदा व सुव्यवस्थेच्या कामांमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासते. अशा वेळी एसआरपीएफमध्ये महिला जवानांचा स्वतंत्र गट कार्यरत असल्यास बंदोबस्ताच्या दृष्टीने अधिक सोयीचे ठरेल, असे असोसिएशनने म्हटले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात एसआरपीएफमध्ये महिलांची भरती सुरू करून भरती झालेल्या महिला जवानांसाठी दोन स्वतंत्र बटालियन गट स्थापन करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. या गटांसाठी खानदेश, विदर्भातील अकोला तसेच पश्चिम महाराष्ट्र किंवा मराठवाडा या भागांमध्ये योग्य ठिकाणी व्यवस्था करावी, अशी सूचनाही निवेदनातून करण्यात आली आहे. अनुकंपा तत्त्वावरील महिला उमेदवारांनाही संधी द्या एसआरपीएफमधील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील बारावी उत्तीर्ण ते पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या पात्र महिला व मुलींना अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळण्याची गरज असते. मात्र, एसआरपीएफमध्ये महिलांची भरती होत नसल्याने पात्र असूनही संबंधित महिला व मुलींना या दलात नोकरीची संधी मिळत नसल्याचा मुद्दा असोसिएशनने उपस्थित केला आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी नोकरीची आवश्यकता असलेल्या या महिलांना न्याय मिळावा, यासाठी एसआरपीएफमध्ये महिला भरती सुरू करणे आणि स्वतंत्र महिला बटालियन स्थापन करणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे. पुण्यातील रुग्णालयांची आरोग्य योजना पूर्ववत करा महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेअंतर्गत पुण्यातील काही प्रमुख रुग्णालयांमध्ये उपचार सुविधा पूर्ववत करण्याची मागणीही करण्यात आली आहे. संबंधित रुग्णालयांची सन २०१९ पासूनची देयके थकीत असल्यामुळे पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना उपचार घेताना गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचे असोसिएशनने निवेदनात नमूद केले आहे. यामध्ये पुढील रुग्णालयांचा समावेश आहे. १. रुबी हॉल क्लिनिक २. जहांगीर हॉस्पिटल ३. नोबेल हॉस्पिटल ४. दीनानाथ हॉस्पिटल ५. भारती हॉस्पिटल या रुग्णालयांमधील महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेच्या सुविधा लवकरात लवकर पूर्ववत कराव्यात, तसेच महाराष्ट्रातील एम्स (AIIMS) रुग्णालयांमध्येही ही आरोग्य योजना सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मागण्यांची गांभीर्याने दखल घेण्याचे आवाहन एसआरपीएफमध्ये महिला भरती व स्वतंत्र बटालियनची स्थापना, अनुकंपा तत्त्वावरील पात्र महिलांना संधी आणि पोलीस कुटुंबीयांसाठी आरोग्य सुविधा पूर्ववत करणे या मागण्यांची शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी, असे आवाहन पोलीस बॉईज असोसिएशनने केले आहे. यावेळी पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे जळगाव जिल्हाध्यक्ष भूषण नागरे, जिल्हा उपाध्यक्ष हेमंत तावडे तसेच जिल्हा कार्यकारिणीच्या सदस्यांनी निवेदन सादर करून या मागण्यांचा पाठपुरावा करण्याची भूमिका मांडली.


