भुसावळ (प्रतिनिधी)- पीक विमा अर्ज भरण्यासाठी ३१ ऑक्टोबर ही अंतिम मुदत असून, आता कमी कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे मतदारसंघातील एकही शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहू नये, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने प्रयत्न करावेत, अशा सूचना आमदार अमोलभाऊ जावळे यांनी पीक विम्याच्या संदर्भात आयोजित ऑनलाइन बैठकीत दिल्या. या बैठकीला आमदार अमोलभाऊ जावळे, आमदार नंदूभाऊ महाजन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तडवी साहेब, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक, प्रांताधिकारी बबन काकडे, यावल, रावेर व मुक्ताईनगरचे तहसीलदार, यावल व रावेरचे तालुका कृषी अधिकारी, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, सहकारी बँकांचे प्रतिनिधी तसेच सीएससी सेंटरचे जिल्हा समन्वयक उपस्थित होते. यावेळी पीक विमा अर्ज भरण्यात येणाऱ्या अडचणी दूर करून सर्व पात्र शेतकऱ्यांचे अर्ज निर्धारित मुदतीत भरून घेण्याबाबत चर्चा करण्यात आली. पीक विमा अर्जासाठी ३१ ऑक्टोबर अंतिम मुदत ज्या शेतकऱ्यांची डिजिटल पीक पाहणी अद्याप ऑनलाइन झालेली नाही, अशा शेतकऱ्यांनी घोषणापत्राच्या आधारे ३१ ऑक्टोबरपर्यंत पीक विमा अर्ज भरून घ्यावेत. पीक विम्याची अंतिम मुदत जवळ आली असल्याने शेतकऱ्यांनी विलंब न करता अर्ज भरून घ्यावेत. बँक किंवा सहकारी संस्थांकडून पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे अर्ज संबंधित बँक व संस्थांनी भरून घ्यावेत. ज्या शेतकऱ्यांनी बँक किंवा सहकारी संस्थांकडून पीक कर्ज घेतलेले नाही, त्यांनी वैयक्तिक स्तरावर पीक विमा अर्ज भरून घ्यावेत. अर्ज भरताना तांत्रिक अडचणी आल्यास ग्रामस्तरीय अधिकारी त्यांना मदत करतील. डिजिटल पीक पाहणी १० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा ज्या शेतकऱ्यांनी अद्याप डिजिटल पीक पाहणी ऑनलाइन केलेली नाही, त्यांनी पीक विमा अर्ज भरल्यानंतर १० नोव्हेंबरपर्यंत डिजिटल पीक पाहणीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. पीक विमा अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर, तर डिजिटल पीक पाहणी पूर्ण करण्याची अंतिम मुदत १० नोव्हेंबर आहे. या दोन्ही स्वतंत्र प्रक्रिया असून, शेतकऱ्यांनी निर्धारित मुदतीत त्या पूर्ण कराव्यात. ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, मंडळ अधिकारी व कृषी पर्यवेक्षक यांनी गावोगावी जाऊन समन्वयाने हे काम पूर्ण करावे, असे निर्देश आमदार अमोल जावळे यांनी दिले. पीक विमा अर्जासाठी कमी कालावधी शिल्लक असल्याने सर्व संबंधित यंत्रणांनी तत्परतेने काम करून कोणताही पात्र शेतकरी विम्याच्या लाभापासून वंचित राहणार नाही, यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले.


