भुसावळ (प्रतिनिधी) - शहरात बुलेट मोटारसायकलींच्या बदललेल्या सायलेन्सरमधून कर्णकर्कश आवाज करत फटाक्यांसारखे आवाज काढणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध भुसावळ शहर वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा उगारला आहे. शहरातील पाणी गेट परिसरात आज सकाळी ११ ते दुपारी १२.३० वाजेच्या दरम्यान विशेष नाकाबंदी करण्यात आली. या कारवाईदरम्यान फटाक्यांसारखे मोठे आवाज काढणाऱ्या पाच बुलेट मोटारसायकलींवर कारवाई करून पाच हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच संबंधित मोटारसायकलींचे सायलेन्सर ताब्यात घेण्यात आले. याशिवाय वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अन्य १७ वाहनचालकांवरही कारवाई करण्यात आली. या सर्व कारवायांमधून एकूण १५ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला. कर्णकर्कश आवाजामुळे नागरिकांना त्रास शहरातील विविध रस्त्यांवर काही बुलेटस्वार बदललेल्या सायलेन्सरचा वापर करून मोठ्या आवाजात वाहन चालवतात. या आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, रुग्ण तसेच सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. विशेषतः वर्दळीच्या रस्त्यांवर अशा प्रकारे फटाक्यांसारखे आवाज काढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता असते. या प्रकारांना आळा घालण्यासाठी वाहतूक शाखेने नाकाबंदी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली. पाच बुलेटचे सायलेन्सर ताब्यात पाणी गेट परिसरात करण्यात आलेल्या नाकाबंदीदरम्यान वाहतूक पोलिसांनी वाहनांची तपासणी केली. यावेळी फटाक्यांसारखे कर्णकर्कश आवाज काढणाऱ्या पाच बुलेट मोटारसायकली आढळून आल्या. संबंधित वाहनचालकांवर प्रत्येकी एक हजार रुपये याप्रमाणे एकूण पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. तसेच या मोटारसायकलींचे सायलेन्सर ताब्यात घेण्यात आले. यासोबतच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अन्य १७ वाहनांवर कारवाई करून दहा हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल भंडारे, पोलीस उपनिरीक्षक खर्चाने, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वानखेडे, पोलीस हवालदार वानखेडे, पोलीस हवालदार विटकर, महिला पोलीस हवालदार अहिरे आणि पोलीस शिपाई प्रशांत चव्हाण यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.


