भुसावळ ( प्रतिनिधी )- दुकानाचे फोटो काढल्याचा संशय घेऊन एका पत्रकाराच्या घरात घुसून जबर मारहाण करणे, घरात तोडफोड करत फिश टँक फोडणे आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार भुसावळ शहरात घडला आहे. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात आरोपी बापु भास्कर जंगले याच्याविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ येथील श्रद्धा नगर, माऊली प्लाझा परिसरातील रहिवासी व दैनिक बातमीदार प्रमोद पाटील हे शनिवारी (१० ऑक्टोबर) दुपारी १ वाजेच्या सुमारास घरात विश्रांती घेत होते. त्यावेळी आरोपी बापु भास्कर जंगले (रा. तापी पब्लिक स्कूल जवळ, भुसावळ) याने त्यांच्या घराची बेल वाजवली. दरवाजा उघडताच आरोपीने "माझ्या दुकानात मुले-मुली येतात, तुम्ही त्यांचे फोटो का काढले?" असा जाब विचारला. त्यावर प्रमोद पाटील यांनी, "मी दुकानाचे फोटो काढलेले नाहीत, तर बेकायदेशीर होल्डिंग्सचे फोटो काढले आहेत," असे स्पष्ट केले. यावरून संतापलेल्या बापु जंगले याने पाटील यांना चापटा-बुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. घरात घुसून तोडफोड अन् धमकी! भांडण सोडवण्यासाठी पाटील यांची पत्नी संगीता पाटील मध्ये पडल्या असता, आरोपीने त्यांनाही चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता आरोपीने घरात घुसून घरातील फिश टँक फोडून तोडफोड केली. गदारोळ ऐकून शेजारी राहणारे सुदाम शिवरामे यांनी मध्यस्थी करत भांडण सोडवले. जाता जाता आरोपीने "तुम्हाला जिवंत सोडणार नाही," अशी जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. विविध कलमांनुसार गुन्हा दाखल या घटनेप्रकरणी संगीता प्रमोद पाटील (वय ४७) यांच्या तक्रारीवरून भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३३३, ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३) आणि ३२४(४) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक राहुल तुकाराम वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जुबेर सिरज तडवी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


