जळगाव पोलिसांची मोठी कारवाई! भुसावळातील बारसे यांच्या हत्येसाठी ३५ लाखांची सुपारी; गँगवारचा कट उधळला : पाच संशयितांना अटक; चार गावठी कट्टे, ११ जिवंत काडतुसे, ६२ ग्रॅम एमडी ड्रग्जसह लाखोंचा मुद्देमाल जप्त ;


जळगाव (प्रतिनिधी) : भुसावळ आणि जळगाव परिसरात संभाव्य गँगवार घडवून आणत हत्याकांड करण्याचा कट जळगाव पोलिसांनी उधळून लावला आहे. भुसावळ येथील मिथुन बारसे, क्रिश बारसे आणि करण यांची हत्या करून त्यांच्या अंगावरील सोने लुटण्याच्या उद्देशाने ३५ लाख रुपयांची सुपारी दिल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. या प्रकरणी आंतरजिल्हा टोळीतील पाच संशयितांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून चार गावठी कट्टे, ११ जिवंत काडतुसे, सुमारे ६२ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी ड्रग्ज), धारदार शस्त्रे आणि वाहनासह लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

३५ लाखांची सुपारी; पाच लाख रुपये आगाऊ

पोलीस तपासानुसार, भुसावळ येथील दुहेरी हत्याकांडातील फरार आरोपी बंटी पथरोड आणि शिव पथरोड यांनी मिथुन बारसे, क्रिश बारसे व करण यांची हत्या करण्यासाठी ३५ लाख रुपयांची सुपारी दिल्याचा आरोप आहे. त्यापैकी पाच लाख रुपये आगाऊ देण्यात आल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.

११ ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यरात्री मिथुन बारसे आणि क्रिश बारसे हे जळगाव शहरातील कंजरवाडा परिसरात एका कार्यक्रमासाठी आले असताना त्यांच्यावर हल्ला करून हत्या करणे आणि त्यांच्याकडील सोने लुटणे, असा कट आखण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पिंप्राळा परिसरात सापळा; पाच जणांना अटक

या कटाची माहिती रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला मिळाल्यानंतर पोलिसांनी पिंप्राळा परिसरातील भवानीमाता मंदिर ते सिल्कमिलसमोरील मोकळ्या जागेत सापळा रचला. यावेळी एमएच-१९-एई-१३५५ क्रमांकाच्या इनोव्हा कारवर धाड टाकून पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आले.

अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

१. खुशाल गजानन बोरसे (रा. खडका रोड, भुसावळ)

२. संदीप बबन लोढे (रा. वाघनगर, जळगाव)

३. राणू उर्फ ओमकार भदरगे (रा. शास्त्रीनगर, ठाणे)

४. अरविंद विजय कांबळे (रा. कासोळा, जि. वाशिम)

५. सोनू महेंद्र जयस्वाल (रा. सातिवली, वसई, जि. पालघर)

या कारवाईत दोन गावठी कट्टे, सात जिवंत काडतुसे, धारदार सुरा, कोयता, मिरची पावडर, दोऱ्या, मास्क, पाच मोबाईल आणि इनोव्हा कार असा एकूण ९ लाख ७७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

उमाळ्यातील भाड्याच्या खोलीत एमडी ड्रग्जसह शस्त्रसाठा

अटक केलेल्या संशयितांची चौकशी केली असता, हत्येचा कट रचण्यासाठी उमाळा (ता. जि. जळगाव) येथे एक खोली भाड्याने घेतल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी या खोलीची झडती घेतली असता आणखी दोन गावठी पिस्तुले, दोन जिवंत काडतुसे, विक्रीसाठी ठेवलेले सुमारे ६२ ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि इलेक्ट्रिक वजनकाटा आढळून आला. जप्त केलेल्या एमडी ड्रग्जची किंमत २ लाख २२ हजार ३०० रुपये असल्याचे सांगण्यात आले.

अशा प्रकारे या कारवाईत एकूण चार गावठी कट्टे आणि ११ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

मुख्य सूत्रधारांसह चौघांची नावे तपासात समोर

पोलीस तपासात बंटी परशुराम पथरोड, शिव परशुराम पथरोड, अभिषेक गोयर आणि मध्यस्थ रवी होळकर यांची नावे या कटातील कथित सूत्रधार व मध्यस्थ म्हणून समोर आली आहेत. त्यानुसार त्यांचीही गुन्ह्यात आरोपी म्हणून नोंद करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, बंटी पथरोड याच्यावर १९, तर शिव पथरोड याच्यावर १२ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

विविध कायद्यांन्वये गुन्हा दाखल

या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २९९/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१०(४), ३१०(५), ६१(२), शस्त्र कायदा आणि अमली पदार्थ व मनःप्रभावी पदार्थ कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची कारवाई

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, दीपक जगदाळे, संतोष पवार, जितेंद्र वल्टे, सहायक पोलीस निरीक्षक अंकुश वारुंगसे यांच्यासह रामानंदनगर पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विशेष पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.