भुसावळ (प्रतिनिधी )- राजोरे येथील एल. एम. पाटील माध्यमिक विद्यालयात श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. पारंपरिक उत्सवाला सामाजिक प्रबोधनाची जोड देत विद्यालयात व्यसनमुक्ती जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी राधा, श्रीकृष्ण व गोपींच्या आकर्षक वेशभूषा परिधान करून उपस्थितांची मने जिंकली. विविध पारंपरिक खेळ व दहीहंडीच्या उत्साहात संपूर्ण विद्यालय परिसर भक्तिमय व आनंदी वातावरणाने भारून गेला होता. या निमित्ताने विद्यार्थ्यांनी साकारलेल्या व्यसनमुक्ती जनजागृती पोस्टर प्रदर्शनातून व्यसनांचे दुष्परिणाम आणि निरोगी जीवनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचे जळगाव जिल्हा संघटक प्रा. डॉ. दयाघन राणे यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीचे महत्त्व पटवून दिले. सक्षम व प्रगत भारताच्या उभारणीसाठी विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी जीवनशैली स्वीकारावी, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती वैशाली इंगळे होत्या. विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न घेता सद्विचार, सद्वर्तन, शिस्त व चांगल्या सवयी आत्मसात कराव्यात. यातूनच उत्तम व जबाबदार नागरिक घडतील, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री गजानन सेवलकर, श्री शिरीष सरोदे तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री मयुर महाजन उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्रीमती अंजुम तडवी, सौ मीनाक्षी नारखेडे, श्री जितेंद्र मधुकर महाजन, श्री राजू सुरनर, श्री किरण नेहेते, श्री तुकाराम नारखेडे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सांस्कृतिक उत्सवाच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे पालक व परिसरातील नागरिकांनी कौतुक केले.