ठाण्यात ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न ; कोकण-मुंबई विभागातील संघटनात्मक विस्ताराला गती;

कोकण-मुंबई विभागीय अध्यक्ष कुमार कडलक महिला प्रदेशाध्यक्ष वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन;
 
ठाणे (प्रतिनिधी)- पत्रकारांच्या हक्कांचे संरक्षण पत्रकारांच्या विविध समस्या आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांना प्रभावी व्यासपीठ मिळवून देण्यासाठी कार्यरत असलेल्या व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमच्या कोकण-मुंबई विभागाची महत्त्वपूर्ण बैठक ठाणे येथील शासकीय विश्रामगृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीला कोकण-मुंबई विभागातील विविध पदाधिकारी आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत संघटनेच्या आगामी वाटचालीचा आढावा घेण्यासोबतच कोकण-मुंबई विभागातील संघटनात्मक विस्तार, विविध विंगची कार्यपद्धती, पदाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या, आगामी उपक्रम तसेच पत्रकारांसमोरील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी कोकण-मुंबई विभागीय अध्यक्ष कुमार कडलक, सर्व विंग प्रमुख तथा कोअर टीम प्रमुख रश्मी मारवाडी, व्ही ओ एम  आंतरराष्ट्रीय समन्वयक स्नेहा पाटील, प्रदेशाध्यक्ष तथा महिला विंग प्रमुख वैशाली पाटील, महाराष्ट्र राज्य कोअर कमिटी सदस्य गौतम वाघ, राज्य सहसंघटक सुरेश जगताप, महिला प्रदेश कार्यकारिणी सदस्य रेवती वालावलकर, प्रदेश सदस्य तथा रत्नागिरी प्रभारी सोनल महाडिक, प्रदेश सहसंयोजक नीतू विश्वकर्मा, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष शैलेश मयेकर, समीर महाडिक, पालघर जिल्हाध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्यासह ठाणे जिल्ह्यातील गौतम गवई, अरुण पाटील, रजनीकांत गायकवाड, ताराचंद तायडे, प्रशांत ढोणे, राजदीप जगताप, रंगनाथ तांगडी, सिमरन पांढरे, दीपक केसरी, प्रतिभा सागरी, हनुमंत जगताप आदी पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते.

बैठकीत कोकण-मुंबई विभागातील संघटना अधिक मजबूत करण्यासाठी विविध स्तरांवर ठोस नियोजन करण्यावर भर देण्यात आला. प्रत्येक जिल्ह्यात संघटनेची प्रभावी बांधणी करण्यासोबतच स्थानिक पत्रकारांशी सातत्याने संपर्क ठेवणे त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि त्या संघटनेच्या माध्यमातून संबंधित प्रशासनापर्यंत पोहोचविण्याबाबत चर्चा झाली. विविध विंगच्या माध्यमातून पत्रकारांपर्यंत संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे पोहोचविणे, पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय वाढविणे, जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडणे तसेच आगामी उपक्रमांची अंमलबजावणी अधिक गतिमान करण्यावर विशेष भर देण्यात आला.

पत्रकारांना काम करताना येणाऱ्या विविध अडचणी, पत्रकारांची सुरक्षितता, पत्रकारांच्या हक्कांचे संरक्षण, पत्रकारांशी संबंधित प्रश्न प्रशासनाच्या निदर्शनास आणून देणे आणि आवश्यकतेनुसार संघटनेच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करणे या विषयांवरही सविस्तर चर्चा झाली. पत्रकारांच्या कोणत्याही अडचणीच्या काळात संघटनेने एकजुटीने त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे अशी भूमिका यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. संघटनेची खरी ताकद पदांमध्ये नसून एकजूट  परस्पर समन्वय आणि पत्रकारांच्या प्रश्नांसाठी सामूहिकपणे उभे राहण्यात आहे असा सूर बैठकीत उमटला.

दरम्यान बैठक सुरू असताना भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे तसेच कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शासकीय विश्रामगृहात भेट देऊन व्हॉईस ऑफ मीडिया पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संघटनेच्या कार्याची माहिती घेत पदाधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली. पत्रकारांच्या हक्कांसाठी संघटनेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कार्याला त्यांनी शुभेच्छा देत संघटनेच्या आगामी वाटचालीस सदिच्छा व्यक्त केल्या.

या बैठकीतील आणखी एक महत्त्वाचा विषय म्हणजे आगामी कोकण विभागीय अधिवेशन. या अधिवेशनाच्या प्राथमिक नियोजनाला बैठकीत सुरुवात करण्यात आली. कोकण विभागातील विविध जिल्ह्यांतील पत्रकारांना एका व्यासपीठावर आणून पत्रकारितेसमोरील आव्हाने, पत्रकारांच्या समस्या, हक्क व सुरक्षितता तसेच संघटनात्मक बांधणी यावर व्यापक चर्चा करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. या अधिवेशनाच्या माध्यमातून कोकण विभागातील संघटनात्मक जाळे अधिक मजबूत करण्यासोबतच पत्रकारांमध्ये संवाद, समन्वय आणि एकजूट वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी विविध समित्या स्थापन करून पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून नियोजन करण्याबाबतही प्राथमिक चर्चा झाली.

बैठकीदरम्यान उपस्थित पदाधिकारी व पत्रकारांनी आपल्या भागातील विविध प्रश्न, अडचणी आणि सूचना मांडल्या. संघटनेच्या आगामी उपक्रमांमध्ये अधिकाधिक पत्रकारांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची भूमिका उपस्थितांनी स्पष्ट केली. कोकण-मुंबई विभागातील प्रत्येक जिल्ह्यात संघटना अधिक सक्षम करण्यासाठी स्थानिक पातळीवर नियमित बैठका घेणे, पत्रकारांशी सातत्याने संवाद साधणे आणि त्यांच्या प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.

ठाणे येथे झालेली ही बैठक केवळ संघटनात्मक आढावा बैठक न राहता कोकण-मुंबई विभागातील पत्रकारांना एकत्र आणण्यासाठी आणि त्यांच्या प्रश्नांना संघटितपणे आवाज देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली. बैठकीच्या शेवटी एकजूट संघटन आणि पत्रकारांच्या हक्कांसाठी संघर्ष या भूमिकेतून व्हॉईस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरमची वाटचाल अधिक जोमाने पुढे नेण्याचा निर्धार करण्यात आला. आगामी काळात कोकण-मुंबई विभागातील संघटनेचा विस्तार अधिक वेगाने करण्यासोबतच पत्रकारांच्या न्याय्य प्रश्नांसाठी प्रभावीपणे लढण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.