भुसावळ, प्रतिनिधी | दि. ३० ऑगस्ट २०२६ : भुसावळ शहरातील १६ वर्षीय मुलीचा पोटदुखीच्या त्रासानंतर उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेप्रकरणी मुलीच्या वडिलांनी संबंधित रुग्णालयातील उपचार पद्धतीची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत संतोष सोनवणे (वय ४१, रा. रूपवते हाउसिंग सोसायटी, भुसावळ) यांनी ३० ऑगस्ट रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांची मुलगी नेहा संतोष सोनवणे (वय १६) हिला ३० ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ८.३० वाजता अचानक पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यानंतर तिची प्रकृती अधिक बिघडल्याची माहिती मिळाल्यानंतर संतोष सोनवणे हे घरी परतले. सुमारे १०.३० वाजता त्यांनी मुलीला उपचारासाठी रुग्णालयात नेले. संबंधित ठिकाणी रुग्णालय बंद असल्याने तिला भुसावळ एका हॉस्पिटलमध्ये दुपारी सुमारे १ वाजता दाखल करण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे. रुग्णालयात संबंधित डॉ. यांनी मुलीवर उपचार सुरू केले. उपचारादरम्यान तिची सोनोग्राफी करण्यात आली. सोनोग्राफीच्या अहवालानुसार पोटात गाठ असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ही गाठ दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करून काढता येईल आणि त्याबाबत फारशी चिंता करण्याचे कारण नसल्याचे सांगण्यात आल्याचा दावा वडिलांनी निवेदनात केला आहे. मात्र उपचार सुरू असतानाच नेहाची प्रकृती गंभीर झाली आणि दुपारी सुमारे ३.१५ वाजता तिचा मृत्यू झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. अचानक झालेल्या या घटनेमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. उपचार पद्धतीची चौकशी करण्याची मागणी नेहाच्या मृत्यूमागील नेमके कारण काय होते, उपचारादरम्यान कोणती वैद्यकीय परिस्थिती निर्माण झाली आणि उपचाराची प्रक्रिया नियमानुसार व योग्य पद्धतीने झाली का, याबाबत निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी संतोष सोनवणे यांनी केली आहे. तसेच संबंधित रुग्णालयातील उपचार पद्धतीची सखोल चौकशी करून चौकशीत दोष आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी आणि मृत्यूमागील वस्तुस्थिती समोर आणावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, सकाळी पोटदुखीचा त्रास सुरू झाल्यानंतर काही तासांतच १६ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याने या घटनेबाबत विविध प्रश्न उपस्थित झाले आहेत. मात्र मृत्यूचे नेमके कारण आणि उपचारादरम्यान झालेल्या घटनांची वस्तुस्थिती अधिकृत वैद्यकीय चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे संबंधित आरोग्य यंत्रणेने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणणे महत्त्वाचे ठरणार आहे.


