सावदा पोलिसांची धडक कारवाई; साडेदहा लाखांच्या मुद्देमालासह प्रतिबंधित गुटखा जप्त, एकास अटक ; भुसावळ व वरणगाव परिसरात विक्रीसाठी आणला होता माल; होंडा अमेझ कारसह १० लाख २७ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

सावदा (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखू, विमल पानमसाला व गुटख्याची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला सावदा पोलिसांनी धडक कारवाई करत रंगेहात पकडले आहे. या कारवाईत प्रतिबंधित गुटखा तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली कार असा एकूण १० लाख २७ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास सावदा पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, राखाडी रंगाच्या होंडा अमेझ कारमधून (क्र. एमएच-१९-सीव्ही-४४४५) प्रतिबंधित गुटख्याची चोरटी वाहतूक करण्यात येत असून ही कार तांदलवाडी फाट्यावरून जाणार आहे. या गोपनीय माहितीच्या आधारे सावदा पोलिसांनी तांदलवाडी फाट्याजवळ सापळा रचला.

रात्री सुमारे अकरा वाजेच्या सुमारास संशयित कार येताना दिसताच पोलिसांनी ती थांबवून तपासणी केली. कारचालक सारंग मुरलीधर अवचार (वय ३१, रा. अकलूद, ता. यावल, जि. जळगाव) याच्याकडे चौकशी केली असता, त्याने कारमध्ये प्रतिबंधित गुटखा असल्याची कबुली दिली.

त्यानंतर दोन खाजगी पंचांसमक्ष कारची झडती घेण्यात आली. झडतीदरम्यान कारमध्ये मोठ्या प्रमाणात विमल पानमसाला, केशरयुक्त पानमसाला तसेच सुगंधित तंबाखूची पाकिटे आढळून आली. त्यामध्ये विमल पानमसाला व तंबाखूचा ५ लाख २७ हजार ७०० रुपये किमतीचा माल, तसेच गुटख्याच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली ५ लाख रुपये किमतीची होंडा अमेझ कार, असा एकूण १० लाख २७ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

प्राथमिक चौकशीत आरोपीने हा प्रतिबंधित माल मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूर येथील एका व्यापाऱ्याकडून भुसावळ व वरणगाव परिसरात किरकोळ विक्री करण्यासाठी आणल्याची माहिती दिली आहे.

याप्रकरणी सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक ०२२२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस), २०२३ मधील कलम १२३, २७४, २७५, १०६ व २२३ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ मधील कलम २६(२)(i), २६(२)(iv), ३०(२)(a) व ५९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड, पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप, पोहेका निलेश बाविस्कर आदींनी यशस्वीरीत्या पार पाडली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप करीत आहेत.