कारागृहातील कैदी बांधवांना राख्या बांधून ‘नारीशक्ती’चा माणुसकीचा संदेश ; रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त जळगाव कारागृहात अनोखा सामाजिक उपक्रम ;

जळगाव (प्रतिनिधी) : रक्षाबंधनाच्या पवित्र सणाचे औचित्य साधून नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेतर्फे जळगाव कारागृहातील कैदी बांधवांना राख्या बांधून बंधुभाव, आपुलकी आणि माणुसकीचा संदेश देण्यात आला. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत प्रेम, विश्वास आणि सामाजिक बांधिलकीची भावना पोहोचावी, या उद्देशाने हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला.

रक्षाबंधन हा केवळ भाऊ-बहिणीच्या नात्याचा सण नसून समाजातील प्रत्येक व्यक्तीला आपलेपणाची जाणीव करून देणारा आणि नात्यांमधील प्रेम व विश्वास दृढ करणारा सण आहे. याच भावनेतून नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या महिला पदाधिकारी व सदस्यांनी जळगाव कारागृहातील कैदी बांधवांची भेट घेत त्यांच्या मनगटावर प्रेम, विश्वास आणि सद्भावनेचे प्रतीक असलेल्या राख्या बांधल्या.

या वेळी कैदी बांधवांनी राखी बांधून घेत आनंद व्यक्त केला तसेच संस्थेच्या पदाधिकारी व सदस्यांचे आभार मानले. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून काही काळ दूर असलेल्या व्यक्तींमध्येही माणुसकी, आपुलकी आणि सकारात्मकतेची भावना निर्माण व्हावी, यासाठी अशा सामाजिक उपक्रमांची नितांत गरज असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा सौ. मनीषा पाटील यांनी सांगितले.

“राखीच्या या पवित्र धाग्यातून माणुसकी, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश पोहोचावा, तसेच प्रत्येकाच्या जीवनात आशेचा किरण निर्माण व्हावा,” हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले.

या उपक्रमातून रक्षाबंधनाचा पवित्र सण सामाजिक संवेदनशीलता, बंधुभाव आणि माणुसकीच्या भावनेने साजरा करण्यात आला. कारागृहातील कैदी बांधवांसोबत सणाचा आनंद वाटून घेत नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेने समाजासमोर सामाजिक बांधिलकीचा एक आदर्श ठेवला.

याप्रसंगी कारागृह अधीक्षक श्री. परदेशी , वरिष्ठ तुरुंग अधिकारी  डी. जी. चव्हाण, अतिरिक्त वरिष्ठ तुरुंग अधिकारी  चंद्रकिरण तायडे यांच्यासह कारागृहातील कर्मचारी उपस्थित होते. तसेच संस्थेच्या अध्यक्षा सौ. मनीषा पाटील, वंदना मंडावरे, आशा मौर्य, नेहा जगताप, किमया पाटील, हर्षा गुजराती यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.