भुसावळ विभागात विशेष ‘फोर्ट्रेस’ तिकीट तपासणी मोहीम; 323 प्रकरणांत कारवाई, 2.46 लाखांचा दंड वसूल

भुसावळ (प्रतिनिधी) : प्रवाशांना सुरक्षित, सुलभ व आरामदायी रेल्वे प्रवासाचा अनुभव देण्याच्या उद्देशाने भुसावळ विभागात विनातिकीट तसेच अनधिकृत प्रवासाला आळा घालण्यासाठी विशेष तिकीट तपासणी मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. याच अनुषंगाने दि. 26 ऑगस्ट 2026 रोजी भुसावळ विभागात विशेष ‘फोर्ट्रेस तिकीट तपासणी मोहीम’ राबविण्यात आली.

या विशेष मोहिमेत भुसावळ विभागातील भुसावळ, जळगाव, नाशिक रोड, मनमाड, खंडवा, अकोला, बडनेरा आणि अमरावती या एकूण आठ प्रमुख स्थानकांचा समावेश करण्यात आला. प्रवाशांनी रेल्वे प्रवासादरम्यान नियमांचे पालन करून वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा तसेच अनधिकृत प्रवासावर प्रभावी नियंत्रण ठेवावे, हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश होता.

मोहिमेत 54 तिकीट तपासणी कर्मचारी तसेच रेल्वे सुरक्षा दलाचे 6 कर्मचारी सहभागी झाले होते. तपासणीदरम्यान एकूण 323 प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली असून, त्यातून ₹2,46,825 इतका दंड वसूल करण्यात आला.

याशिवाय, रेल्वे अधिनियम 1989 च्या कलम 145 (ब) अंतर्गत अस्वच्छता व घाण पसरविण्याच्या 5 प्रकरणांमध्ये कारवाई करून ₹5,000 दंड वसूल करण्यात आला. तसेच, रेल्वे अधिनियम 1989 च्या कलम 147 अंतर्गत रेल्वे रुळांवर अथवा रेल्वेच्या मालमत्तेवर अनधिकृत प्रवेश अर्थात ट्रेसपासिंग केल्याप्रकरणी 6 जणांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून ₹3,010 दंड वसूल करण्यात आला.

भुसावळ विभागाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, त्यांनी जबाबदारीने व शिस्तबद्ध पद्धतीने प्रवास करताना योग्य आणि वैध तिकीट घेऊनच रेल्वे प्रवास करावा. यामुळे अनावश्यक गैरसोय तसेच दंडात्मक कारवाई टाळता येईल.

प्रवाशांनी अधिकृत तिकीट विक्रेते, रेल्वे स्थानकांवरील बुकिंग काउंटर, ATVM किंवा IRCTCच्या अधिकृत माध्यमातून वैध तिकीट घ्यावे. तसेच, प्रवासी आपल्या मोबाईलमध्ये ‘RailOne’ अॅप डाउनलोड करून त्याद्वारेही तिकीट बुक करू शकतात.

भुसावळ विभागाने सर्व प्रवाशांना रेल्वे नियमांचे पालन करून प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि सुखकर करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.