ड्युटीवर असतानाच काळाचा घाला; भुसावळात महावितरणच्या वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू!

भुसावळ (प्रतिनिधी) - नारळी पौर्णिमेच्या दिवशी हृदयदायक घटना भुसावळ शहरात घडली आहे
शहरातील महावितरणच्या डीएस ग्राउंड कक्षात कार्यरत असलेल्या एका वरीष्ठ तंत्रज्ञ वायरमनचा विद्युत धक्का बसून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी, २७ ऑगस्ट रोजी पहाटे घडली. फॉल्ट तपासण्यासाठी गेले असताना हा अपघात झाल्याचे संबंधित वायरमनने भुसावळ शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या जबाबात नमूद केले आहे. या घटनेमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

मृत वायरमनचे नाव वैभव पुरुषोत्तम दांडेकर (वय 35) असे आहे.ते गौरक्षण संस्था जामनेर रोड, भुसावळ येथे राहत होते. ते मागील सुमारे तीन ते साडेतीन वर्षांपासून भुसावळ महावितरणच्या डीएस ग्राउंड कक्षात वायरमन म्हणून कार्यरत होते.

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, २७ ऑगस्ट रोजी रात्री १२ ते सकाळी ८ वाजेपर्यंत अजय चौधरी यांची ड्युटी होती. त्यांच्यासोबत दीपक लिधुरे आणि वैभव पुरुषोत्तम दांडेकर हेही ड्युटीवर होते. रात्री सुमारे १२ ते १२.२० वाजेच्या दरम्यान परिसरातील वीज खंडित झाल्याबाबत ग्राहकाच्या मोबाईल क्रमांकावरून तक्रार प्राप्त झाली.

यानंतर संबंधित तक्रारीची दखल घेत अजय चौधरी, दीपक लिधुरे आणि वैभव दांडेकर हे फॉल्ट तपासण्यासाठी निघाले. पोलिस जबाबानुसार, रात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास गांधीपुतळा चौक परिसरातील पेट्रोल पंपासमोर असलेल्या डीएस कॉम्प्लेक्सजवळ ११ केव्ही कटपॉईंटजवळ फॉल्ट तपासण्याचे काम सुरू करण्यात आले.

फॉल्ट तपासण्यासाठी वैभव दांडेकर हे पायऱ्यांच्या सहाय्याने वर गेले. त्यांच्यामागे अजय चौधरीही वर जात होते, तर दीपक लिधुरे खाली उभे होते. त्याचवेळी वर गेलेल्या वैभव दांडकर यांना अचानक विजेचा जोरदार धक्का बसल्याचे जबाबात नमूद करण्यात आले आहे. मोठा आवाज झाल्यानंतर अजय चौधरी यांनी पाहिले असता वैभव खाली पडलेले दिसून आले.

घटनेनंतर अजय चौधरी यांनी तत्काळ दीपक लिधुरे यांच्याशी संपर्क साधून मदतीसाठी माहिती दिली. तसेच मोबाईलवरून महावितरणचे सहाय्यक अभियंता अजय गावंडे यांना घटनेची माहिती देण्यात आली. सहाय्यक अभियंता गावंडे यांनी आजूबाजूच्या नागरिकांना मदतीसाठी बोलावले.

त्यानंतर सहाय्यक अभियंता अजय गावंडे यांच्या खासगी चारचाकी वाहनातून जखमी वैभव दांडकर यांना तातडीने ट्रॉमा केअर सेंटर, भुसावळ येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर वैभव दांडेकर यांना मृत घोषित केले.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अजय चौधरी यांनी भुसावळ शहर पोलिस ठाण्यात हजर राहून संपूर्ण प्रकाराबाबत माहिती दिली असून या प्रकरणी पुढील योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, अशीही विनंती त्यांनी पोलिसांकडे केली आहे.

दरम्यान, फॉल्ट तपासणीदरम्यान झालेल्या या दुर्घटनेमागील नेमके कारण, विद्युत प्रवाहाची स्थिती आणि सुरक्षेच्या उपाययोजनांबाबतची वस्तुस्थिती तपासल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

रक्षाबंधनाचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना, तीन बहिणींच्या पाठीवरचा एकुलता एक भाऊ आणि घरातील कर्ता पुरुष हिरावला गेल्याने दांडेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.