जळगाव (प्रतिनिधी) : शहरात कडक ऊन, मुसळधार पाऊस आणि प्रतिकूल परिस्थितीची पर्वा न करता अहोरात्र वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करत ‘नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था’, जळगावच्या वतीने अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन सोहळा साजरा करण्यात आला. या उपक्रमांतर्गत शहरातील विविध प्रमुख चौकांमध्ये कर्तव्यावर तैनात असलेल्या वाहतूक पोलिसांच्या मनगटावर महिलांनी प्रेमाने राख्या बांधल्या. तसेच त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी, सुरक्षेसाठी आणि दीर्घायुष्यासाठी सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या. दिवसभर रस्त्यावर उभे राहून वाहतूक सुरळीत ठेवणाऱ्या पोलिसांच्या कार्याची दखल घेत नारीशक्ती संस्थेच्या महिलांनी स्वतः विविध चौकांमध्ये जाऊन हा रक्षाबंधनाचा स्नेहपूर्ण उपक्रम राबविला. या अनपेक्षित आणि आपुलकीच्या उपक्रमामुळे वाहतूक पोलिसांच्या चेहऱ्यावरही आनंद आणि समाधान दिसून आले. या विशेष उपक्रमात नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा मनीषा पाटील यांच्यासह आशा मौर्य, नेहा जगताप, दिपाली कुलकर्णी, मंगला खडके, पल्लवी सोनवणे, वैशाली वाणी आदी महिला पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. रक्षाबंधन हा केवळ भाऊ-बहिणीच्या नात्यातील स्नेहाचा सण नसून समाजातील रक्षणकर्त्यांप्रती कृतज्ञता आणि आपुलकी व्यक्त करण्याचाही संदेश देणारा सण आहे. याच भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे जळगाव शहरात सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.



