जळगाव रेल्वे स्थानकाच्या शिवाजीनगर बाजूस नूतनीकृत तिकीट खिडकीची सुविधा सुरू

भुसावळ (प्रतिनिधी)- 
प्रवाशांना अधिक सुलभ, सोयीस्कर आणि जलद तिकीट सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जळगाव रेल्वे स्थानकाच्या शिवाजीनगर बाजूस नूतनीकृत रेल्वे तिकीट खिडकीची सुविधा आज, दिनांक २७ ऑगस्ट २०२६ पासून सुरू करण्यात आली आहे.

या नूतनीकृत तिकीट कार्यालयाचे उद्घाटन  खासदार श्रीमती स्मिता ताई वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी  आमदार राजू मामा भोळे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक  पुनीत अग्रवाल, वरिष्ठ शाखा अधिकारी, स्टेशन प्रबंधक, रेल्वे कर्मचारी तसेच प्रवासी आणि नागरिक उपस्थित होते.

जळगाव रेल्वे स्थानकाच्या शिवाजीनगर बाजूस असलेल्या या तिकीट खिडकीमुळे परिसरातील प्रवाशांना रेल्वे तिकीट काढण्यासाठी स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत येण्याची आवश्यकता राहणार नाही. त्यामुळे विशेषतः शिवाजीनगर परिसरातील तसेच लगतच्या भागातील प्रवाशांची मोठी सोय होणार असून, तिकीट खरेदीसाठी लागणारा वेळ आणि प्रवासाचा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे. या तिकीट खिडकीवर फक्त अनारक्षित रेल्वे तिकिटांची सुविधा उपलब्ध असेल. या तिकीट खिडकीचे संचालन दोन शिफ्टमध्ये करण्यात येणार आहे. 

प्रथम शिफ्ट: सकाळी ०६:०० ते दुपारी १४:०० वाजेपर्यंत
द्वितीय शिफ्ट: दुपारी १४:०० ते रात्री २२:०० वाजेपर्यंत

भुसावळ विभाग प्रवाशांना सुरक्षित, सुलभ, आरामदायी आणि प्रवासी-केंद्रित सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने विविध उपाययोजना राबवत आहे

शिवाजीनगर बाजूने रेल्वे स्थानकात ये-जा करणाऱ्या प्रवाशांना या सुविधेमुळे तिकीट खरेदी करणे अधिक सोयीचे होणार आहे. प्रवाशांनी या नूतनीकृत तिकीट खिडकीच्या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातर्फे करण्यात आले आहे.