( वरणगाव व परिसरातील प्रवाशांची बसस्थानक परिसरात असते गर्दी ) *वरणगाव(वार्ता)- वरणगाव शहर व परिसरातील २७ खेडे गावांचा संपर्क येत असल्याने येथील बसस्थानकावर मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गर्दी होते . मात्र, या बसस्थानक चौकाला खाजगी प्रवाशी वाहनांचा विळखा पडत असल्याने प्रवाशांना अनेक समस्यांचा त्रास सहन करावा लागतो . यामध्ये सर्वाधिक त्रास महिला प्रवाशी वर्गाला सहन करावा लागत असुन या चौकात महिलांसाठी सुसज्ज असे प्रसाधन गृह नसल्याने त्यांची मोठ्या प्रमाणात कुचंबणा होत असून नाराजी व्यक्त केली जात आहे . वरणगाव शहराची दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असल्याने या शहरातील बसस्थानक चौकात भुसावळकडून विदर्भाकडे जाणाऱ्या तसेच विदर्भाकडून भुसावळ, जळगाव, नाशिक, पुणे अशा अनेक लांब पल्ल्याच्या बसेसला या चौकात थांबा देण्यात आला आहे . यामुळे शहर व शहराच्या परिसरातील २७ खेडेगावातील प्रवाशांची लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी सकाळ पासुन महामंडळाच्या बसने तसेच रात्री खाजगी लक्झरी बसने पुणे व इतर ठिकाणच्या प्रवासाकरीता या बसस्थानक चौक परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी असते . मात्र, बसस्थानक चौक परिसरात ग्रामपंचायतीच्या कालावधी पासुन एक लहानसे पुरुष व महिला करीता प्रसाधन गृह उभारण्यात आले असुन सद्यस्थितीत त्या प्रसाधन गृहाची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहे . तसेच प्रसाधन गृहाच्या नियमीत स्वच्छते अभावी अस्वच्छता व दुर्गंधीमुळे महिला प्रवाशी तसेच या परिसरात भाजीपाला विक्रेत्या महिलांची मोठ्या प्रमाणात कुचंबणा होत असल्याने त्यांच्यामध्ये नगर परिषदेच्या कारभाराविषयी संतापयुक्त नाराजी व्यक्त केली जात आहे . यासाठी नगर परिषदेच्या माध्यमातून बसस्थानक चौक परिसरात सुसज्ज असे प्रसाधन गृह निर्माण करण्याची मागणी होत आहे . ◾ *नगरपरिषदेत १२ नगरसेविका असुनही दुर्लक्ष ?* वरणगाव नगर परिषदेच्या माध्यमातून सर्वच प्रभागात महिला व पुरुषांसाठी सुसज्ज अशा प्रसाधन गृह , शौचालयाची निर्मीती करण्यात आली असून या शौचालयाच्या देखभाल व दुरुस्तीचा ठेका देण्यात आला आहे . यामुळे या शौचालयाची नियमीत स्वच्छता केली जात असल्याने महिला व पुरुषांना दिलासा मिळत आहे . मात्र, नगर परिषदेत २४ पैकी १२ महिला नगरसेविका असुनही बसस्थानक चौकात महिला व पुरुषांसाठी अद्यापही सुसज्ज अशा प्रसाधन गृह व शौचालयाची निर्मितीला प्राधान्य देण्यात आले नाही . यामुळे नगर परिषद प्रशासनाने बसस्थानक चौकातील प्रसाधन गृह अभावी होणारी महिलांची कुचंबणा टाळण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक झाले आहे . *सोशल मिडीयावरून प्रसाधन गृहाची मागणी* शहराच्या बसस्थानक चौकात प्रसाधन गृह व शौचालय अभावी महिलांची होणारी कुचंबणा लक्षात घेऊन शहरातील अर्जुन धनगर, स्वप्नील भोई, राजेश इंगळे, अतुल शेटे, कुलदीप देशमुख, सुनिल डोयसे यांनी शहरातील एका सोशल मीडिया ग्रुपवर प्रसाधन गृह व शौचालय मागणीचा विषय लावून धरला आहे .


