भुसावळ (प्रतिनिधी)- सेंट अलॉयशियस हायस्कूल, भुसावळ येथे १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली. या कार्यक्रमासाठी जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष श्री. आबिद शेख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर शीला सायमन यांनी केले. यानिमित्त आयोजित सहविचार सभेत माजी विद्यार्थ्यांमधून अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष तसेच माजी विद्यार्थी व माजी शिक्षकांचा समावेश असलेली कार्यकारिणी गठित करण्यात आली. यावेळी २०२१ ते २०२६ या कालावधीतील माजी विद्यार्थ्यांच्या फुटबॉल सामन्याचे उद्घाटन प्रमुख पाहुणे आबिद शेख यांच्या हस्ते फुटबॉलला किक मारून करण्यात आले. यावेळी त्यांनी माजी विद्यार्थी संघाची रूपरेषा, उद्दिष्टे तसेच भविष्यातील कार्याची सविस्तर माहिती उपस्थितांसमोर मांडली. फुटबॉल स्पर्धेत २०२२ च्या बॅचने उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले, तर २०२४ च्या बॅचला उपविजेतेपद मिळाले. उपविजेत्या संघाला शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर शीला सायमन यांच्या हस्ते, तर विजेत्या संघाला प्रमुख पाहुणे आबिद शेख यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले. माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या हस्ते खेळाडूंना पदके व सन्मानपत्रे देण्यात आली. चहा-नाश्ता तसेच खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे माजी विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक, माजी विद्यार्थी व आयोजकांनी परिश्रम घेतले.



