साकेगावजवळ राष्ट्रीय महामार्गावरील भीषण अपघात; गंभीर जखमी नंदीवर तातडीने उपचार करून पाळधी येथे अतिदक्षता विभागात दाखल
भुसावळ (प्रतिनिधी)- पहिल्या श्रावणी सोमवारी महादेवाचे वाहन मानल्या जाणाऱ्या एका गंभीर जखमी नंदीला गोसेवकांच्या तत्परतेमुळे जीवनदान मिळाले. साकेगावजवळ राष्ट्रीय महामार्गावर भरधाव अज्ञात ट्रकने नंदीला जोरदार धडक दिल्याने त्याच्या दोन पायांना गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर जखमी अवस्थेत नंदी रस्त्यावर जीवनासाठी तळमळत होता. भुसावळकडे येत असताना श्री. राका यांच्या निदर्शनास ही घटना आली. त्यांनी तातडीने मानद पशुकल्याण अधिकारी व गोसेवक रोहित रमेश महाले यांना माहिती दिली. प्रवासात असतानाही महाले यांनी विलंब न करता घटनास्थळ गाठले. पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या मदतीने गंभीर जखमी नंदीवर घटनास्थळी प्राथमिक उपचार करण्यात आले आणि त्याचे प्राण वाचविण्यात यश आले. यानंतर पुढील उपचारासाठी नंदीला गावातील गोसेवकांच्या मदतीने श्री सिद्धी गणपती हॉस्पिटल, पाळधी येथे अतिदक्षता उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रसंगी गोसेवकांनी भावनिक आवाहन केले की, “महादेवाचे वाहन नंदी आहे. आपण दगडी नंदीची श्रद्धेने पूजा करतो; मग साक्षात जिवंत नंदी संकटात असताना त्याला वाचविणे हीच खरी नंदीसेवा नाही का?” घटना समोर आल्यानंतर उपस्थितांनी सांगितले की, मदत पोहोचण्यास आणखी विलंब झाला असता तर नंदी चुकीच्या हातात जाण्याची भीती होती. त्यामुळे रस्त्यावर किंवा परिसरात जखमी, आजारी अथवा बेवारस गोवंश आढळल्यास नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने स्थानिक गोभक्त, गोसेवक किंवा पशुवैद्यकीय डॉक्टरांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले. “आपली गोमाता किंवा नंदी यांना शेवटच्या श्वासापर्यंत घरीच सांभाळा किंवा गोशाळेत सोडा; पण त्यांना चुकीच्या आणि राक्षसी हातात देऊ नका,” असे मनोगत गोसेवक रोहित महाले यांनी व्यक्त केले. नंदीच्या उपचारांचा वैद्यकीय खर्च श्री. योगेश पाटील यांनी केला. या पवित्र कार्यात साकेगाव येथील गोसेवक, महाराज, डॉक्टर प्रदीप श्रीखंडे, रोहित महाले, आदित्य धायडे, कुणाल शिंदे, वैभव नेहते तसेच समस्त गोभक्तांनी मोलाचे सहकार्य केले. पहिल्या श्रावणी सोमवारी घडलेल्या या सेवाकार्यातून “दगडी नंदीची पूजा करण्याबरोबरच जिवंत नंदीचे प्राण वाचविणे हीच खरी महादेवसेवा” असा संवेदनशील संदेश या गोसेवकांनी समाजासमोर आणला आला आहे.


