भुसावळ आगाराला पाच नव्या ‘जिजाऊ’ बसेस; मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते लोकार्पण ;

भुसावळ ( प्रतिनिधी )-  भुसावळ व परिसरातील प्रवाशांना उत्तम दर्जाची आणि अधिक चांगली बससेवा उपलब्ध व्हावी, यासाठी भुसावळ आगाराला पाच नव्या ‘जिजाऊ’ बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते रविवारी या बसेसचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला.

भुसावळ आगारातील काही जुन्या बसेस स्क्रॅप होणार असल्याने आगार व्यवस्थापक प्रमोद चौधरी यांनी प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पाच ‘जिजाऊ’ बसेस आणि दहा ‘लालपरी’ बसेस उपलब्ध करून देण्याची मागणी मंत्री संजय सावकारे यांच्याकडे केली होती. या मागणीची तातडीने दखल घेत मंत्री सावकारे यांनी पाच ‘जिजाऊ’ बसेस उपलब्ध करून दिल्या. यापूर्वीदेखील भुसावळ आगाराला पाच नवीन ‘जिजाऊ’ बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

मंत्री संजय सावकारे यांनी फित कापून तसेच नारळ वाढवून नव्या बसेसचे लोकार्पण केले. यावेळी नगरसेवक राजेश आवटे, नाना पाटील सर, सुनील वानखेडे सर यांच्यासह प्रमुख पाहुणे उपस्थित होते.

लोकार्पण सोहळ्यानिमित्त बसेसना फुलांचे हार, फुगे, पताका तसेच केळीचे खांब लावून आकर्षक सजावट करण्यात आली होती. बससमोर सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.

यावेळी आगार व्यवस्थापक प्रमोद चौधरी, स्थानक प्रमुख जयेश लोहार, मयूर काळे, सूरज पवार, शांताराम चौधरी, सहायक कार्यशाळा अधीक्षक राहुल सोनवणे, भूषण महाजन यांच्यासह एसटी महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धर्मराज देवकर यांनी केले. सजावटीसाठी जितेंद्र डोळसे, संदीप महाजन, भूषण महाजन, सतीश बोंडे, धर्मराज देवकर, खेमचंद पाटील, सौ. किरण तायडे, नितीन सोनवणे, इरफान तडवी आदींनी सहकार्य केले.

नव्या ‘जिजाऊ’ बसेसमुळे भुसावळ शहरासह परिसरातील प्रवाशांना अधिक चांगली, सुरक्षित आणि दर्जेदार प्रवासी सेवा मिळण्यास मदत होणार आहे.