भुसावळसह परिसरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा; देशभक्तीच्या वातावरणात विविध कार्यक्रम .

भुसावळ प्रतिनिधी :
भुसावळसह परिसरात भारताचा ८०वा स्वातंत्र्य दिन विविध शासकीय, सामाजिक, शैक्षणिक व प्रशासकीय संस्थांच्या वतीने मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर शासकीय ध्वजारोहण प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी तहसीलदार निता लबडे, प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे, गटनेते युवराज लोणारी, नगरसेवक-नगरसेविका, पोलीस अधिकारी, महसूल व नगरपालिका कर्मचारी, होमगार्ड, अग्निशमन विभागाचे कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी वृक्षारोपण करण्यात आले तसेच उपस्थितांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली.
नगरपालिका कार्यालयाच्या प्रांगणात प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी गटनेते युवराज लोणारी, नगरसेवक किरण कोलते, परीक्षित बऱ्हाटे, बबलू बऱ्हाटे, गिरीष महाजन, निर्मल कोठारी, निकी बत्रा, पिंटू ठाकूर, नगरसेविका महिमा नागराणी, सोनल महाजन, छाया देशमुख, प्राची पाटील, मेघा वाणी यांच्यासह नगरसेवक, विविध समित्यांचे सभापती व कर्मचारी उपस्थित होते. शहरातील बाजारपेठ पोलीस ठाणे, शहर पोलीस ठाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय तसेच विविध शाळांमध्येही ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात पार पडले.