‘बम बम भोलेच्या गजरात, भुसावळमध्ये १७ ऑगस्ट श्रावण सोमवार रोजी महिलांची भव्य कावड यात्रा;

भुसावळ (प्रतिनिधी ) : पवित्र श्रावण महिन्यानिमित्त पहिल्या सोमवारी भगवान भोलेनाथाच्या भक्तीमय दर्शनार्थ भुसावळ येथील जेसीआय भुसावळ ताप्ती यांच्या वतीने भव्य महिला कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.   ही पावन यात्रा सोमवार, १७ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३ वाजता अष्टभुजा देवी मंदिर येथून सुरू होणार असून रानातळा महादेव मंदिर येथे तिचा समारोप होणार आहे.

‘आस्थेची डगर, सेवेचा संग—महिला शक्तीचा भव्य उमंग’ या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या यात्रेत शहरातील सर्व महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन भगवान भोलेनाथाचे आशीर्वाद घ्यावेत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या यात्रेसाठी लाल व पिवळा असा ड्रेस कोड ठेवण्यात आला आहे. भक्ती, सेवा आणि महिला शक्तीचा सुंदर संगम या यात्रेत अनुभवायला मिळणार आहे.

या उपक्रमाचे नेतृत्व अध्यक्ष जेसी हेमा बेहरा आणि सचिव जेसी रेखा व्यास करीत आहेत. प्रोजेक्ट चेअरपर्सन म्हणून वर्षा जैन, पल्लवी झोमे, निकिता खुशालानी, नंदिनी रायपुरे, गीतिका दरगड़, सुहानी पोहानी, अनुराधा ठाकूर, दीपा पटेल, प्राची राजपाल, सुहाना आहूजा, संगीता शर्मा आणि रुचिता अग्रवाल कार्यरत आहेत.

‘भक्ती आमची, शक्ती आमची, कावड आमची, आस्था आमची’ या भावनेतून ही महिला कांवड यात्रा भव्य आणि अविस्मरणीय करण्यासाठी सर्व भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन जेसीआय भुसावळ ताप्ती तर्फे करण्यात आले आहे.